नांदेड : गुन्हेगारी घटली हे दाखविण्यासाठी आकडे कमी नाेंदविले जातात; परंतु त्यात वास्तव तेवढे नसते, अनेकदा गुन्हेगारी कमी दाखविण्यासाठी चक्क गुन्हा दडपण्याचे (बर्किंग) प्रकार घडतात. अशा प्रकरणात ताेच धाेका अधिक असताे. हे निरीक्षण आहे नांदेड परिक्षेत्राचे विशेष पाेलीस महानिरीक्षक निसार तांबाेळी यांचे.
महानिरीक्षक तांबाेळी यांनी ‘लाेकमत’शी विविध विषयांवर संवाद साधला. ते म्हणाले, मी एवढ्या वर्षांत गुन्ह्यांची संख्या का वाढली म्हणून कधी कुणाला जाब विचारला नाही, मेमाे दिला नाही किंवा नाेटीस दिली नाही. उलट गेल्या वर्षीपेक्षा चालू वर्षी गुन्ह्यांची संख्या वाढलेली दिसत असेल, तर पाेलीस यंत्रणेने गुन्हे दाखल करून घेण्यात हयगय केली नाही किंवा गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला नाही, असे आपण मानताे. जेथे गुन्हे कमी झाल्याचे दाखविले जाते तेथे गुन्हे बर्किंगचा संशय अधिक राहताे. काेणत्याही परिस्थितीत गुन्हे बर्किंग करू नका, आकडे वाढले तरी चालतील, फिर्याद नाेंदवून घ्या, खातरजमा करून गुन्हा दाखल करा, तपास करून ताे डिटेक्ट करा, अशा स्पष्ट सूचना आपण चारही जिल्ह्यांतील ठाणेदारांना दिल्या असल्याचे तांबाेळी यांनी सांगितले. नांदेड परिक्षेत्रात एकीकडे चाेऱ्या वाढल्या आहेत, तर दुसरीकडे घरफाेड्यांची संख्या कमी झाल्याचे दाखविले जात आहे. मात्र, ही बाब संशयास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
वाहन चाेरीत बिलाेली, देगलूर कनेक्शन
नांदेड शहरातील वाहन चाेरीत बिलाेली, देगलूर कनेक्शन वारंवार उघड झाले आहे. गेल्या वर्ष-दीड वर्षात गुन्हेगारी वाढण्यामागे काेराेना, लाॅकडाऊन हेसुद्धा एक प्रमुख कारण पुढे आले आहे. काेराेना संसर्गाच्या भीतीने आराेपींना तातडीने जामीन दिला जात हाेता. मात्र, ते कारागृहातून बाहेर येताच पुन्हा गुन्हा करीत असल्याचे आढळून आले. अशा गुन्हेगारांवर सतत वाॅच ठेवण्याच्या सूचना पाेलिसांना देण्यात आल्या आहेत.
अपघात, चाेरी व बेवारस वाहनांची पाेलीस ठाण्यांच्या आवारात झालेली गर्दी कमी करण्यात आली आहे. त्यासाठीची प्रक्रिया क्लिष्ट आहे. अपघातातील वाहन नेण्यास संबंधित मालक तयार नसल्याने त्याच्या घरापर्यंत ते वाहन पाेहाेचून देण्याचे साैजन्य दाखविले आहे. अनेक ठाण्यांतील वाहनांचा लिलाव झाला असून, इतर ठाण्यांतील वाहनांचा लिलाव हाेणार आहे.
चाैकट...
ठाणे-वसाहत इमारतींचा प्रश्न गंभीर
पाेलीस ठाणे व निवासी वसाहतींचा प्रश्न परिक्षेत्रात माेठा आहे. लातूरमध्ये तर जुन्या इमारतींमध्ये पाेलीस ठाणे चालविले जात आहे. हे धाेकादायकही आहे. त्यामुळेच परिक्षेत्रात नव्या इमारतींचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. नांदेडमधील स्नेहनगर ही पाेलीस वसाहत जुनी झाली असून, माेडकळीस आली आहे. तेथे आता रिपेअरिंग शक्य नाही, ती इमारत पाडून नव्याने बांधणे हाच मार्ग असल्याचे तांबाेळी यांनी सांगितले.
चाैकट...
मनुष्यबळ व्यवस्थापन हवे
काेणत्याही पाेलीस ठाण्यात गेल्यास मनुष्यबळ पुरेसे नाही, कमी आहे हे सातत्याने सांगितले जाते. मात्र, उपलब्ध मनुष्यबळाचा खराेखरच किती वापर करून घेतला जाताे, हे पाहणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी मनुष्यबळ व्यवस्थापनावर भर देण्याची आवश्यकता पाेलीस महानिरीक्षक निसार तांबाेळी यांनी व्यक्त केली.