परंतु प्रशासनाच्या वतीने निवेदनाची दखल घेण्यात आली नसल्यामुळे माकपच्या वतीने १३ फेब्रुवारी रोजी काळ्या फिती लावून एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे माकप सचिव कॉ. गंगाधर गायकवाड यांनी कळविले आहे.
सफाई कामगार व विद्यापीठातील इतर कंत्राटी कामगारांच्या पगारातून बळजबरीने दरमहा दोन हजार प्रमाणे लूट करणारी टोळी विद्यापीठात सक्रिय असून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीने जोर धरला आहे.तसेच किमान वेतनाप्रमाणे कामगारांना पगार द्यावा. पगारातून लूट केलेली रक्कम कामगारांना परत करावी. काम जाईल या भीतीपोटी कामगार दबावाखाली असल्यामुळे विद्यापीठातील संबंधित सर्वांची सीआयडी चौकशी करावी. बहुतांशी कामगार व फिर्यादी कामगार दलित असल्यामुळे गुन्हेगारांवर ॲट्रॉसिटी व इतर कलमान्वये गुन्हे दाखल करावेत. कामगारांची लूट करणाऱ्या एजन्सीजला पुन्हा ठेका न देता काळ्या यादीत टाकावे. अनेक दिवसांपासून एकाच ठिकाणी असलेल्या स्वच्छता निरीक्षकाची चौकशी करून कारवाई व हकालपट्टी करावी. प्रत्येक कामगारांना किमान वेतन देण्यात यावे.
या सफाई कामगार पगार लूट घोटाळ्यामध्ये काही एम.सी.मेंबर व सिनेट मेंबर असण्याची दाट शक्यता असल्यामुळे त्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करणार असल्याचे सीटूचे नांदेड जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी सांगितले.