बिलोली ( नांदेड ) : मजुरीच्या पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन मध्यप्रदेशच्या मजुरांनी हरभरा काढणी यंञाचा मालक व त्याच्या मुलाचा खून केल्याची घटना मंगळवारी ( दि.१) उघडकीस आली आहे. पोलिसांनी थेट मध्यप्रदेश गाठत या दुहेरी खूनाचा उलगडा केला असून मजूर आरोपींनी पित्याचा मृतदेह दफन केले तर पुञाचा मृतदेह उमरखेड घाटात फेकले असल्याची कबुली दिली आहे. खुनाची ही घटना २० फेब्रुवारी रोजी मध्यराञी बिलोली तालुक्यातील हुनगुंदा गावात घडली.
हरभरा, उडीद, मुग,सोयाबीन यासारखे खरीप पिके काढणीस आले आहेत. व्यापाराची संधी साधत राजस्थान येथिल पिता-पुत्र हरभरा काढणी यंञ घेऊन कामाच्या शोधात बिलोली तालुक्यातील हुनगुंदा येथे दाखल झाले. या यंञावर मध्यप्रदेशातील ५ मजुरांनी कामास सुरुवात केली. मात्र, २ महिने काम केल्यानंतर पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन मालक व मजुरात कुरबुर सुरु झाली. मालक मजुरी बुडवित असल्याची शंका आल्याने पाचही २० फेब्रुवारीस मजुरांनी पिता-पुञांचा खून केला.
अशी लावली मृतदेहांची विल्हेवाटदोघांच्या खुनानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मजुरांनी मालकाचा मृतदेह कुंडलवाडी शहरापासुन थोड्याच अंतरावर सुरु असलेल्या रस्त्याच्या शेजारील खड्ड्यात दफन केले. तर पुत्राचा मृतदेह उमरखेड घाटात फेकून देत आपले गाव गाठले.
पोलिसांनी थेट मध्यप्रदेश गाठले दरम्यान, मृताच्या कुटुंबीयांनी कुंडलवाडी पोलीस ठाणे गाठुन २५ फेब्रुवारी रोजी हरवल्याची फिर्याद दिली. त्यावरुन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी तपास सुरु केला. पोलिसांनी थेट मध्यप्रदेश गाठत मजुरांची माहिती घेणे सुरु केले. दोन मजुरांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली. तसेच मालक आणि पुत्राचा मृतदेहाची कशी विल्हेवाट लावली याचा घटनाक्रम सांगितला.