नांदेड : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह खा़हेमंत पाटील आणि खा़प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती़ चव्हाणांनी ९७ हजारांच्या मताधिक्याने भोकरचा गड एकहाती सर केला़ तर चार विद्यमान आमदारांना मतदारांनी नाकारले़ महाआघाडी अन् महायुतीला प्रत्येकी चार जागा मिळाल्या असून तब्बल २९ वर्षानंतर लोह्यामध्ये शेकापचा खटारा सुसाट धावला़
जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीत नांदेड उत्तर मतदारसंघात जायंट किलर ठरत सेनेच्या बालाजी कल्याणकर यांनी माजी राज्यमंत्री अन् हॅट्ट्रीकच्या तयारीत असलेल्या डी़पी़सावंत यांचा १५ हजारांच्या मताधिक्क्याने पराभव केला़ नांदेड दक्षिण मतदारसंघात अपक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्यामुळे पक्षीय उमेदवारांची डोकेदुखी वाढली होती़ या ठिकाणी काँग्रेसने नवख्या मोहन हंबर्डे यांना रिंगणात उतरविले होते़ या ठिकाणी भाजप-सेना, एमआयएम अन् वंचित यामध्ये मोठ्या ्रप्रमाणात झालेल्या मतविभाजनाचा फायदा हंबर्डे यांना मिळाला़ अवघ्या साडेतीन हजारांनी त्यांनी विजय मिळविला़
राज्याचे लक्ष लागून असलेल्या भोकर मतदारसंघात भाजपाने तेल लावून मैदानात उतरविलेल्या बापूसाहेब गोरठेकर यांचा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सहज पराभव केला़ या ठिकाणी चव्हाण यांना ९७ हजारांचे मताधिक्य मिळाले़ गोरठेकर यांच्यासाठी भाजपाने संपूर्ण ताकद लावली होती़ खा़ प्रताप पाटील चिखलीकर हेही भोकरमध्ये तळ ठोकून होते़ परंतु, भोकरवासियांनी पुन्हा एकदा अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकला़ लोहा मतदारसंघात चिखलीकरांचे मेहुणे श्यामसुंदर शिंदे यांनी शेकापकडून निवडणूक लढविताना वंचितच्या शिवा नरंगले यांचा पराभव केला़ तर सेनेचे मुक्तेश्वर धोंडगे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले़ शिंदे यांच्या खटाऱ्याला चिखलीकरांनी धक्का दिल्याची चर्चा आहे़ त्यामुळे या ठिकाणी महायुतीचा धर्म पाळला नसल्याची ओरड धोंडगे यांनी केली आहे़
हदगाव मतदारसंघ गाजला तो शिवसेनेचे बाबूराव कदम यांच्या बंडखोरीने़ या ठिकाणी शेवटच्या टप्प्यात काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या गंगाधर पाटील चाभरेकर यांना सेनेच्या नागेश पाटील आष्टीकर यांनी आपल्या गोटात घेतले होते़ त्यामुळे आष्टीकर यांचे पारडे जड झाले होते़ परंतु या ठिकाणी खरी लढत काँग्रेसचे माधव पवार आणि अपक्ष बाबूराव कदम यांच्यातच झाली़ अखेरच्या काही फेऱ्यात पवार हे विजयी झाले़
नायगावात वसंतरावांचा दारुण पराभवच्नायगाव मतदारसंघात भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांनी आपल्या सुनेसाठी उमेदवारी मागितली होती़ परंतु भाजपने या ठिकाणी राजेश पवार यांना उभे केले़तर त्यांच्यापुढे काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे हॅट्ट्रिकच्या तयारीत होते़ त्यामुळे या लढतीकडे लक्ष लागले होते़ परंतु वसंतराव चव्हाण यांचा राजेश पवार यांनी तब्बल ५३ हजार ३८४ मतांनी पराभव केला़ त्यामुळे या मतदारसंघाचे राजकीय गणित आता बदलणार आहे़ या ठिकाणी मारोतराव कवळे गुरुजी यांनाही फारसा प्रभाव पाडता आला नाही़
मुखेडमध्ये पुन्हा तुषार राठोड यांना संधीदिवंगत गोविंद राठोड यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत डॉ़तुषार राठोड हे भाजपाकडून विजयी झाले होते़ परंतु यावेळी त्यांच्यासमोर रामदास पाटील यांनी तिकिटासाठी मोठे आव्हान उभे केले होते़ परंतु, शेवटच्या क्षणी भाजपाकडून राठोड यांनाच रिंगणात उतरविण्यात आले़ तर काँग्रसने उमेदवार बदलत भाऊसाहेब मंडलापूरकर यांना तिकीट दिले़ परंतु तुषार राठोड यांनी या मतदारसंघात ३१ हजारांच्या फरकाने विजय मिळविला़ पुन्हा एकदा हा मतदारसंघ भाजपकडे राखण्यात यश मिळविले़
मोठ्या फरकाच्या झाल्या लढतीया निवडणुकीत भोकर, लोहा, नायगाव, मुखेड आणि देगलूर येथे मोठ्या फरकाच्या निवडणुका झाल्या़ भोकरमध्ये अशोकराव चव्हाण यांना ९७ हजार ४४५, लोह्यात शेकापचे श्यामसुंदर शिंदे यांना ६१ हजार १४५, नायगावमध्ये राजेश पवार यांना ५४ हजार ३८४, मुखेडमध्ये तुषार राठोड यांना ३१ हजार ८६३ तर देगलूर मतदारसंघात रावसाहेब अंतापूरकर यांना २२ हजार ४३३ मते अधिक मिळाली़ तर सर्वात कमी फरकाने नांदेड दक्षिणमधून काँग्रेसचे मोहन हंबर्डे हे विजयी झाले़ त्यांना ३ हजार ५०० एवढे मताधिक्य मिळाले़
या निकालांची ठळक वैशिष्ट्ये काय?माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खा़प्रताप पाटील चिखलीकर आणि खा़हेमंत पाटील यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती़ अशोकरावांनी पुन्हा एकदा भोकर मतदारसंघात आपले वर्चस्व सिद्ध केले़ तर दुसरीकडे भोकरच्या पराभवाने चिखलीकरांना धक्का बसला असला तरी, श्यामसुंदर शिंदेचा विजय दिलासादायक आहे़ तर हेमंत पाटील यांच्या सौभाग्यवतींचा पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे़