नांदेड : शिवसेना-भाजपाच्या जागा वाटपात लोहा-कंधार मतदारसंघ सेनेला सोडण्यात आला आहे़ त्यामुळे संतप्त झालेल्या खा़ प्रताप पाटील चिखलीकर समर्थकांनी मंगळवारी बैठक घेवून बंडाचे निशाण फडकाविले़ यावेळी चिखलीकर यांनीही दोन दिवस वाट पहा, लोहा-कंधारसह नांदेड उत्तर आणि दक्षिणचाही निर्णय लावू, असे वक्तव्य केल्याने नांदेडात सेना-भाजप आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ याबाबतचा अंतिम निर्णय गुरुवारी घेण्यात येईल, असेही चिखलीकरांनी स्पष्ट केले़
युतीच्या जागावाटपात लोहा-कंधार मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला होता़ गेल्यावेळी प्रताप पाटील चिखलीकर हे सेनेच्या तिकिटावरुनच निवडून आले होते़ परंतु आता चिखलीकर भाजपावासी झाले असून खासदार म्हणूनही निवडून आले आहेत़ त्यामुळे हा मतदारसंघ भाजपाला सोडण्यात यावा़ तसेच या ठिकाणी प्रवीण पाटील चिखलीकर यांना उमेदवारी द्यावी अशी चिखलीकर समर्थकांची मागणी होती़ तर चिखलीकरांचे मेहुणे श्यामसुंदर शिंदे यांनीही भाजपाकडून उमेदवारीसाठी दावा केला होता़ त्यावरुन चिखलीकरांच्या घरातच कलह निर्माण झाला होता़ तर गेल्या अनेक दिवसांपासून प्रवीण पाटील यांचेच नाव चर्चेत होते़ त्यादृष्टीने प्रवीण पाटील चिखलीकर यांनी मतदारसंघात भेटीगाठींना सुरुवातही केली होती़ परंतु सोमवारी रात्री सेनेने हा मतदार संघ आपल्याकडेच ठेवला़ त्यामुळे चिखलीकर समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे़
मंगळवारी चिखलीकर यांच्या निवासस्थानाबाहेर समर्थकांनी मोठी गर्दी केली होती़ कार्यकर्त्यांनी चिखलीकर यांना तुम्ही मतदारसंघात येवू नका, आम्ही आमचं पाहून घेतो़ प्रवीणला आमदार म्हणून आम्ही निवडून आणतो़, अशा भावना व्यक्त केल्या़ तर काहींनी भाजपासाठी एवढे कष्ट उपसले असताना ऐनवेळी विश्वासघात करण्यात आला़ त्यामुळे चिखलीकर मित्रमंडळाची ताकद दाखवून देवू असा इशारा दिला़नांदेडच्या स्थानिक नेतृत्वाचाही बंदोबस्त करण्याची भाषा काही जणांनी वापरली़ स्थानिक नेतृत्वाच्या लुडबुडीमुळेच प्रवीण पाटील यांचे तिकीट कापले गेल्याचा संताप व्यक्त करण्यात आला़ चिखलीकर मित्रमंडळाने ‘नवं धोरण नवं तोरण’ अशी घोषणा यावेळी केली़ तसेच पक्षाने तिकीट दिले नाहीतरी, लोहा-कंधारमधून अपक्ष लढविण्याची तयारी ठेवावी, अशी गळ चिखलीकर समर्थकांनी घातली़ यावेळी व्यासपीठावर भाजपाचे महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, राज्य कार्यकारिणी सदस्य चैतन्यबापू देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील भाजपाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते़
दोन दिवस प्रतीक्षा करा-चिखलीकरखा़प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला होता़ परंतु ऐनवेळी उमेदवारी सेनेला जाहीर करण्यात आली़ परंतु यातूनही मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु आहे़ अपक्ष उभा राहिला तरी, प्रवीण ५० हजारांच्या मताधिक्क्याने निवडून येईल़ परंतु याबाबत मुख्यमंत्र्यांचा शब्द अंतिम आहे़ त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच पुढील निर्णय घेवू़ परंतु पुढचे दोन दिवस वाट पहा़ वेळ पडल्यास लोहा-कंधारसह दक्षिण आणि उत्तरचाही निर्णय लावू, असेही खा.चिखलीकर म्हणाले़ शिवसेनेकडून नांदेड दक्षिणमधून राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली़ त्यानंतर मंगळवारी सकाळी खा़ हेमंत पाटील व राजश्री पाटील या दोघांनी चिखलीकरांचे निवासस्थान गाठून त्यांची भेट घेतली़ यावेळी त्यांच्यात काही मिनिटे चर्चाही झाली़ पाटील गेल्यानंतर थोड्याच वेळात कार्यकर्त्यांनी त्यांच्याच नावाने आगपाखड केली.