नांदेड : जिल्ह्यात युतीच्या फॉर्मुल्यानुसार सेनेच्या पाचपैकी चार जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे़ नांदेड दक्षिणमधून राजश्री पाटील, नांदेड उत्तर बालाजी पाटील कल्याणकर, देगलूर सुभाष साबणे तर हदगाव मतदारसंघातून नागेश पाटील आष्टीकर यांची उमेदवारी निश्चित झाली आहे़ तर लोहा-कंधारचे चित्र मात्र अद्यापही स्पष्ट झाले नाही़ यामध्ये राजश्री पाटील आणि बालाजी कल्याणकर हे दोघेही नवखे उमेदवार आहेत़
सेनेच्या पहिल्या यादीत राजश्री पाटील, सुभाष साबणे आणि नागेश पाटील आष्टीकर यांची नावे होती़ त्यानंतर नांदेड उत्तरमधून कोण? याबाबत उत्सुकता होती़ मंगळवारी दुपारपासूनच सेनेचे पदाधिकारी मातोश्रीवर ठाण मांडून होते़ सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास नांदेड उत्तरमधून बालाजी कल्याणकर यांचे नाव समोर आले़ उत्तरमधून अनेक जण इच्छुक होते़ परंतु महापालिकेत सेनेचे एकमेव नगरसेवक असलेल्या कल्याणकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली़ तर नांदेड उत्तरमध्ये काँग्रेसकडून डी़पी़सावंत, वंचितचे मुकुंद चावरे, देगलूरमध्ये रावसाहेब पाटील अंतापूरकर हे काँग्रेसचे उमेदवार असतील़ तर वंचितचे रामचंद्र भरांडे हे ही या ठिकाणी नशीब आजमावत आहेत़ नांदेड दक्षिणमध्ये वंचितकडून फारुख अहमद हे रिंगणात उतरले आहेत़
सेना-भाजपात जिल्ह्यात लोहा मतदारसंघावरुन निर्माण झालेला तिढा न सुटल्यास या मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून प्रणिता देवरे-चिखलीकर यांना उमेदवारी देण्याची मागणी चिखलीकर समर्थकांनी केली आहे. तर दुसरीकडे भाजपाचेच दिलीप कंदकुर्ते, डॉ. संतुकराव हंबर्डे यांनीही बंडाचे निशाण फडकाविले. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कोणकोणते बदल होतील, याकडेही लक्ष लागले आहे. ४ आॅक्टोबरनंतरच या मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
मुखेडात रामदास पाटील यांच्या भूमिकेकडे लक्षविधानसभा मतदारसंघातून भाजपातर्फे रामदास पाटील यांनी उमेदवारीसाठी जोर लावला होता़ पाटील यांनाच उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणी मुखेडमधील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी करीत पक्षश्रेष्ठींचीही भेट घेतली होती़ मात्र मुखेडमधून विद्यमान आ़तुषार राठोड यांची उमेदवारी जाहीर झाली़ दरम्यान, रामदास पाटील यांनी मुखेड मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह कायम आहे़ एका प्रमुख पक्षानेही पाटील यांच्याकडे उमेदवारीसाठी विचारणा केल्याने रामदास पाटील आता काय निर्णय घेतात़ याकडे मुखेडकरांचे लक्ष लागले आहे़