- विशाल सोनटक्के
नांदेड : लोकसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर विधानसभेचीही शिवसेना-भाजपाने जय्यत तयारी केली़ मात्र उमेदवार निवडीवरून या दोन्ही पक्षात गोंधळाचे वातावरण आहे़ लोहा-कंधारसह हदगाव मतदारसंघातही युतीसमोर बंडाचे निशाण फडकण्याची चिन्हे असल्याने कालपर्यंत काँग्रेस आघाडीसाठी अवघड वाटणारी विधानसभेची निवडणूक युतीच्या उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर काहीशी सुकर होत आहे़ लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचा पराभव करुन भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर विजयी झाले़ तेव्हापासून जिल्ह्यात शिवसेना-भाजपासाठी पोषक वातावरण तयार झाले होते़
चिखलीकर समर्थक आक्रमकचिखलीकर यांची होमपीच असलेला लोहा-कंधार मतदारसंघ ते सहजरित्या शिवसेनेकडून भाजपसाठी सोडवून घेतील, असे अपेक्षित होते़ मात्र मंगळवारी लोहा-कंधारची जागा शिवसेनेसाठी सुटल्याचे जाहीर झाल्यानंतर चिखलीकर यांचे समर्थक आक्रमक झाले़ दुपारी चिखलीकर यांच्या निवासस्थानासमोर सुमारे दोन ते तीन हजार कार्यकर्त्यांनी एकत्रित येवून लोहा-कंधारमधून तुम्ही उमेदवार द्या, आम्ही शिवसेनेला धडा शिकवितो़ असे जाहीर आव्हान दिले़ मात्र चिखलीकरांनी संयमी भूमिका घेतली़ आणखी दोन दिवस वाट पाहा, त्यानंतर काय तो निर्णय घेऊ, असे सांगत मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले़
चिखलीकर यांनी अशारितीने समन्वयाची भूमिका घेतली असली तरी, सेना-भाजप कार्यकर्त्यांत मोठ्या प्रमाणात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून याचा फटका लोहा-कंधारसह इतर जागांवरही बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ केवळ लोहा-कंधारच नव्हे, तर नांदेड दक्षिणमधून चिखलीकर यांनी उमेदवार द्यावा़ त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही घेतो, अशा शब्दात समर्थकांनी रोष व्यक्त केल्याने शिवसेना-भाजपातील नाराजी युतीला भोवण्याची चिन्हे आहेत़
माजी जिल्हाप्रमुख बाबूराव कदम यांनी बंडाचा झेंडा फडकविला
दुसरीकडे हदगाव-हिमायतनगर मतदारसंघात शिवसेना पक्षश्रेष्ठींनी विद्यमान आ़ नागेश पाटील आष्टीकर यांच्या उमेदवारीवर मोहोर लावली़ मात्र या निर्णयामुळे माजी जिल्हाप्रमुख बाबूराव कदम यांनी बंडाचा झेंडा फडकविला आहे. त्यांच्या समर्थकांनी एकत्रित येवून मंगळवारी सकाळी कदम यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्यासाठी आग्रह धरला़ एवढेच नव्हे, तर कदम समर्थक गटाने निवघा सर्कल बाजारपेठ बंद ठेवून शिवसेनेने आष्टीकर यांना दिलेल्या उमेदवारीचा निषेध नोंदविला़ त्यानंतर बाबूराव कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. कदम यांच्या या पावित्र्यामुळे शिवसेना उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या अडचणी वाढणार आहेत.
उत्तर नांदेडमध्ये डी़ पी़ सावंत यांना दिलासाकाँग्रेस आ़ डी़ पी़ सावंत यांची उमेदवारी जाहीर झाली असून सलग तिसऱ्यावेळी ते उत्तर नांदेडमधून रिंगणात उतरले आहेत़ नांदेड उत्तरमधून सावंत यांच्यासमोर युती आणि वंचित बहुुजन आघाडीतर्फे कोण मैदानात उतरते़ याकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या़ मात्र वंचित बहुजन आघाडीने या मतदार संघातून मुकुंद चावरे हा नवा चेहरा मैदानात उतरविला आहे़ तर शिवसेनेने नगरसेवक बालाजी कल्याणकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे़ सावंत यांच्या तुलनेत हे दोन्ही उमेदवार नवखे आहेत.
उमेदवारीवरून वंचितमध्येही नाराजीलोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने १ लाख ६५ हजार इतकी मते खेचत प्रमुख पक्षांचे लक्ष वेधले होते़ त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी चर्चा होती़ सोमवारी वंचित आघाडीने नऊपैकी सात उमेदवारांच्या नावांची घोषणा केली़ मात्र या उमेदवार यादीनंतर वंचितच्या समर्थकांत नाराजीचा सूर व्यक्त होत आहे़ नांदेड उत्तर मतदारसंघातून मुकुंद चावरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खुद्द पदाधिकाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले़ तर भोकर मतदारसंघातून नामदेव आईलवाड हे कितपत लढत देतात याबाबतही पक्षाचे पदाधिकारीच साशंकता व्यक्त करीत आहेत़