नांदेड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह मराठा आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरित रद्द करावेत, आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या तरुणाच्या कुटुंबातील एकास शासकीय नोकरी द्यावी तसेच 50 लाख रुपये आर्थिक मदत करावी आदी मागण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली असून या बंदला नांदेड जिल्ह्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
शहरात येणारे जवळपास सर्वच रस्त्यावर आंदोलकांनी ठिय्या दिल्याने तुरळक ठिकाणी वाहने पाहायला मिळत आहे. मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट पहायला मिळत आहे. दरम्यान, अर्धापूर तालुक्यातील शनी पार्डी येथे नांदेड -हिंगोली रस्त्यावरील अर्धापुर जवळ शेणी पाटी येथे पहाटेपासून रास्ता रोको सुरू केल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अशीच परिस्थिती मालेगाव, लातूर फाटा, सावरगाव, धामधरी , निळा आदी ठिकाणी आहे. काही ठिकाणी रस्ता अडविण्यासाठी टायर जाळण्यात येत आहेत तर निळा रस्त्यावर झाड तोडून टाकले आहे.
नांदेड शहरातील मुख्य ठिय्या आंदोलनास 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सुरुवात झाली. बससेवा, शाळा बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे. दरम्यान, या बंदला नांदेड मुस्लिम समाजातर्फे ठिकठिकाणी बॅनर लावून पाठिंबा दिला आहे. शहरात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.