नांदेड : उमरी तालुक्यातील तळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर तब्बल ११३ वर्षांच्या आजीबाईंनी आज मतदानाचा हक्क बजावला. रुक्मीणबाई ईरबाजी जाधव असे या आजीचे नाव आहे.
मतदान दिवशी सार्वजनिक सुटी असल्याने अनेकजण मतदान न करता सुटीसाठी बाहेरगावी जातात.तर काही लोक कंटाळा करत आपला मतदानाचा हक्क बजावत नाहीत. मात्र आजही काही मतदार मतदानाच्या आपल्या हक्कास सर्वोच्च प्राधान्य देतात. उमरी तालुक्यातील तळेगाव येथील ११३ वर्षांच्या रुक्मीणबाई ईरबाजी जाधव यांनी आज मतदान करत हेच दाखवून दिले. प्रशासनाच्या वतीने प्राप्त व्हीलचेअरच्या आधाराने त्यांना तळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर आणण्यात आले. यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी विलास कोळनूरकर, माधव खंडेलोटे, नागेश गंधारे यांनी मदत केली.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४४.५८ टक्के मतदान झाले. हदगावमध्ये सर्वाधिक ५१.३३ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.