- राजेश वाघमारे
भोकर : भोकर मतदारसंघात शेवटच्या दिवशीपर्यंत तब्बल १३४ इच्छुकांनी १४७ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतु अर्जाच्या छाननीत ४३ अर्ज अवैध ठरल्याने ९१ अर्ज शिल्लक राहिले होते. सर्वाधिक उमेदवारांचा मतदारसंघ म्हणून सर्वांचे लक्ष लागले असताना अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी ३ वाजेपर्यंत ८४ इच्छुकांनी अर्ज माघार घेतल्याने आता ७ उमेदवार निवडणूक रिंगणात राहणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांनी दिली.
विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी १३४ इच्छुकांनी नामांकन दाखल केले होते. अर्जाच्या छाननीतच ४३ इच्छुक अपात्र ठरले होते़ तर ९१ उमेदवारांचे अर्ज वैध झाल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला होता. परंतु, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी यातील ८४ जणांनी माघार घेतली़ अर्ज माघारी घेतल्यानंतर आता भोकर विधानसभा मतदारसंघातून ७ उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावणार आहेत. दरम्यान, अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात भाजपाने नायगाव मतदारसंघातील बापूसाहेब गोरठेकर यांना उमेदवारी दिली आहे़ गोरठेकर यांच्या उमेदवारीला भाजपातूनच अंतर्गत विरोध होता़ निष्ठावंतांना डावलल्याची भावनाही कार्यकर्त्यांच्या मनात आहे़ त्यामुळे हे निष्ठावंत नेमकी काय भूमिका घेतात? हेही महत्त्वाचे आहे़ दुसरीकडे अशोकराव चव्हाण यांचा मतदारसंघात मोठा जनसंपर्क आहे़ पक्षात तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी असून चव्हाण यांनी आतापर्यंत मतदारसंघ पिंजून काढला आहे़
शंकररावांपासून मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्वभोकर विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत २००९ मध्ये अशोक चव्हाण विजयी झाले होते. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत अमिता चव्हाण विजयी झाल्या होत्या. पार पडलेल्या दोन्ही निवडणुकीत भाजपचे डॉ.माधवराव किन्हाळकर यांचा पराभव झाला होता. दिवगंत शंकरराव चव्हाणांपासून हा मतदारसंघ चव्हाण कुटुंबियांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे़ या मतदारसंघात सिंचन आणि इतर विकासकामे केल्याच्या जोरावर आजपर्यंत या मतदारसंघाने काँग्रेसला साथ दिली आहे.
2०14चे चित्रअमिता चव्हाण(विजयी) माधव किन्हाळकर (पराभूत)