नांदेड : निवडणूक कोणतीही असो त्या काळात दारुविक्रीत अचानक मोठ्या प्रमाणात वाढ होते़ यावेळच्या विधानसभा निवडणुकीतही त्याचा प्रत्यय येत आहे़ सर्रासपणे उमेदवारांकडून कार्यकर्त्यांना श्रमपरिहारासाठी अन् मतदारांना आमिषासाठी मद्याची झिंग चढविण्यात येत आहे़ मतदानापूर्वी दोन दिवस असलेल्या ‘ड्राय डे’ मुळे अनेकांनी अगोदरच मोठ्या प्रमाणात स्टॉक करुन ठेवला आहे़ राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे असलेल्या अधिकृत आकडेवारीवरुन ही बाब स्पष्ट झाली आहे़ परंतु असे असले तरी, अवैधपणे येणाऱ्या दारुची तर मोजदादच नाही़
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात एकूण २४ लाख ८७ हजार २६२ एवढी मतदारसंख्या होती़ त्यामध्ये सरासरी पन्नास टक्के मतदार या महिला आहेत़ त्यामुळे जवळपास साडेबारा लाख पुरुष मतदारांची संख्या होती़ त्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात जिल्ह्यात २९ लाख ९१ हजार ५७७ लिटर दारु मद्यपींनी रिचविली होती़ त्यात १९़८० लाख लिटर देशी दारु, ३़९२ लिटर भारतात तयार झालेली विदेशी दारु, ५़६५ लाख लिटर बिअर व ४ हजार ५७७ लिटर वाईनचा समावेश होता़ या काळातही मोठ्या प्रमाणात दारुचे अवैध साठे पकडण्यात आले होते़ २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तर त्यामध्ये जवळपास सहा लाख लिटरने वाढ झाली़ लोकसभेसाठी नांदेड जिल्ह्यात २५ लाख ५० हजार एवढी मतदार संख्या होतीआचारसंहितेच्या काळात जिल्ह्यात ३५ लाख ५२ हजार ७८ लिटर दारुची विक्री करण्यात आली़
त्यात २४़२१ लाख लिटर देशी दारु, ४़९५ लाख लिटर भारतात तयार झालेले विदेशी मद्य, ८़३१ लाख लिटर बिअर तर ५ हजार ७८ लिटर वाईनची विक्री करण्यात आली होती़ प्रत्येक निवडणुकीनिहाय दारु विक्रीमध्ये लाखो लिटरची वाढ होत आहे़ त्यामुळे शासनाच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसूल जमा होत असला तरी, अवैधपणे इतर राज्यांतून येणाऱ्या दारुचे प्रमाणही अधिक आहे़ तपासणीत हाती लागल्यानंतरच त्याची मोजदाद होते़ त्याचबरोबर गाव-खेड्यांमध्ये या काळात हातभट्ट्यांनाही मोठ्या प्रमाणात ऊत येतो़ त्याचीही फारशी दखल घेतली जात नाही़ शेजारील राज्यातूनही मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने दारु आणली जाते़ महाराष्ट्रापेक्षा तिथे दारु स्वस्त मिळते़ हीच दारू नांदेड जिल्ह्यात येत आहे़
उमेदवारांनी कार्यकर्त्यांसाठी करुन ठेवला स्टॉकमतदानाच्या दिवसापर्यंत सलग तीन दिवस अन् मतमोजणीच्या दिवशी ड्राय डे असल्यामुळे कार्यकर्ते आणि मतदारांची गैरसोय होवू नये यासाठी अनेक उमेदवारांनी दारुचा स्टॉक करुन ठेवला आहे़ देशी अन् विदेशी मद्याचे बॉक्सच जवळच्या कार्यकर्त्यांकडे दिले आहेत़ कोणत्या कार्यकर्त्याला किती बाटल्या द्यायच्या याचेही चोख नियोजन करण्यात आले आहे़ प्रचारफेरीमध्ये मद्यपी किती ? यावरुन स्टॉकची विल्हेवाट लावण्यात येत आहे़ धाबे, बार हाऊसफुल्ल झाले असून उमेदवार आपल्या शेतातील आखाड्यावर मांसाहाराच्या पार्ट्याचे आयोजन करीत आहेत़ रात्रीच्या वेळी चालणाऱ्या अशा पार्ट्यांवरही निवडणूक विभागाचे लक्ष आहे़
यंत्रणा हतबलनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू रोखण्याचे निर्देश आहेत़ मात्र त्यानंतरही अनेक ठिकाणी अवैध दारूचे पेव फुटले आहे़ राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे कारवाईच्या काही घटना घडल्या असल्या तरी शहराबरोबरच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दारूविक्री होत असल्याचे दिसून येते़