हदगाव : विधानसभेसाठी काँग्रेसकडून डावलण्यात आलेले गंगाधर पाटील चाभरेकर यांनी आज मुंबई येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. चाभरेकर हे हदगावमधून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. त्यांनी कॉंग्रेसकडे तिकीटाची मागणी केली होती मात्र त्यांना डावलण्यात आल्याने त्यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतला.
मतदारसंघातील बड्या नेत्यांना आपलंस करण्यात शिवसेना उमेदवार आमदार नागेश पाटील आष्ठीकर यांना यश आले आहे. सेनेचा बंडखोर उमेदवार विरोधात असल्याने कॉंग्रेसच्या नाराज चाभरेकर यांच्या पक्ष प्रवेशाने आष्ठीकर यांना बळ मिळाले आहे. तर चाभरेकर यांचा सेना प्रवेश काँग्रेसला मोठा फटका असल्याचे मानल्या जात आहे. शिवसेनेच्या बाबूराव कदम यांच्या बंडामुळे आधीच हदगाव जिल्ह्यात चर्चेत आहे. त्यातच आता काँग्रेसच्या बंडखोर नेत्याने सेना प्रवेश केल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे.
काँग्रेसच्या उमेदवारीसाठी माधव पवार व गंगाधर पाटील चाभरेकर या दोघांमध्ये अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत रस्सीखेच होती. परंतु उमेदवारी न मिळाल्यामुळे गंगाधर पाटील चाभरेकर यांनी बंडखोरी केली होती़ त्यानंतर सोमवारी चाभरेकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली़ परंतु नाराज चाभरेकर नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष होते. शिवसेनेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांची खरी लढत काँग्रेस उमेदवारासोबत होती मात्र सेनेतच बंडखोरी झाल्याने त्यांना निवडणूक कठीण असल्याची चर्चा आहे. यामुळेच चाभरेकर यांच्या सेना प्रवेशाला महत्व प्राप्त झाले आहे.