- विशाल सोनटक्केनांदेड : जलयुक्त शिवार योजना ही मुळची काँग्रेसची योजना होती़ या योजनेतून काही चांगली कामे झाली असली तरी यात भाजपा सरकारकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला़ त्यामुळे योजनेमागचा हेतू सफल होवू शकला नाही़ आता वॉटरग्रीडच्या नावाने प्रचार केला जात आहे़ मात्र एकीकडचे पाणी काढायचे आणि दुसरीकडे टाकायचे, यातून दुष्काळमुक्ती कशी काय होणार? असा प्रश्न करीत या योजनेच्या नावे मराठवाड्यातील जनतेची निव्वळ धूळफेक सुरू असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केला़
बुधवारी सकाळी ते खास लोकमतशी बोलत होते़ भाजप सरकारच्या मागील पाच वर्षाच्या कारभाराकडे पाहिले असता या सरकारने महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होते़ आज प्रचाराच्या निमित्ताने गावागावात फिरत आहे़ मात्र एकाही गावात संपूर्ण कर्जमाफी झालेला एकही शेतकरी भेटला नसल्याचे ते म्हणाले़ भाजपाने कालच संकल्प पत्र जाहीर केले़ पाच वर्षात एक कोटी रोजगार देण्याची घोषणा केली़ मागच्या वर्षीच्या जाहीरनाम्यातही त्यांनी अशीच आश्वासने दिली होती़ त्या आश्वासनांचे काय झाले? रोजगार सोडा, आहे तो कामधंदा बंद पडला आहे़ त्यामुळे बेरोजगारांची फौज निर्माण झाली आहे़ मात्र या प्रश्नाबाबत सरकार अद्यापही गंभीर नाही़ विरोधकांना नमविण्यासाठी सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला़
पीएमसी बँकेसंदर्भात विचारले असता सदर बँक घोटाळ्यात भाजपाच्या जवळचे १२ महत्त्वाचे लोक गुंतलेले आहेत़ ईडी आणि इतर कारवाईच्या नोटीसा तुम्ही दुसऱ्यांना पाठवता, मग पीएमसी घोटाळ्यात अद्यापपर्यंत सरकारने ठोस कारवाई का केली नाही? असे ते म्हणाले़ नांदेडचा पाण्याचा विषय गंभीर आहे़ सहा तालुक्याला सध्या उर्ध्व पैनगंगेचे पाणी येते़ मात्र या भागातील १५ हजार हेक्टरवरील पाणी वळविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे़ असे झाल्यास आमच्या भागातील शेती काय, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे़ भाजपाचा हा निर्णय भविष्यात नांदेडचे वाळवंट करणारा आहे़ त्यामुळेच या विरोधात मी सर्व पातळीवर लढा देत आहे़ मात्र सरकार ढिम्म आहे़ मुख्यमंत्री दोन वेळा जिल्ह्यात येवून गेले़ मात्र या पाणीप्रश्नाबाबत त्यांनी चकार शब्द काढला नसल्याचेही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले़