- विशाल सोनटक्के
नांदेड : चाळीस वर्षे सत्तेत राहिलो, मात्र प्रशासकीय यंत्रणा ताब्यात घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही. मात्र मागील काही महिन्यात नांदेड जिल्ह्यात जे काही घडते आहे ते चिंता वाढविणारे आहे. सत्तेच्या बळावर अधिकारी, कर्मचाऱ्यांना कळसूत्री बाहुल्याप्रमाणे वागवले जात आहे. वसंतनगरहून पोलीस अधिकाऱ्यांच्या पोस्टींग केल्या जात आहेत. दुसरीकडे वाळू माफियांशी हातमिळवणी करुन टक्केवारीत जमविलेला पैसा प्रचारामध्ये आणला जात आहे. कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्नही गंभीर झाला आहे. वकील, डॉक्टर, खाजगी क्लासेससह राजकारण्यांनाही खंडणीसाठी धमक्या दिल्या जात आहेत. याविरोधात येणाऱ्या काळात विधानसभेसह सर्वस्तरावर आवाज उठवू, यासाठी नांदेडकरांनीही साथ देत अपप्रवृत्ती रोखण्यासाठी उठाव केला पाहिजे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
चव्हाण यांनी बुधवारी सकाळी खास संवाद साधला. भोकरमध्ये माझ्याविरोधात विजयाच्या उन्मादात असलेल्याच्या बालहट्टापायी आयात उमेदवार दिला आहे. ज्याला किनवट आणि किनी यातला फरक कळेना. या उमेदवाराच्या प्रतिज्ञापत्राबाबतही महिलेने तक्रार केली आहे. आता तर उमेदवार घरी आणि खासदार प्रचारात अशी स्थिती आहे. भोकरमधून मी निश्चितपणे विजयी होईल. परंतु मला चिंता आहे ती नांदेड जिल्ह्याची. मागील काही महिन्यात जिल्ह्यात अपप्रवृत्तींनी डोके वर काढल्याचे सांगत चव्हाण यांनी पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या गोंधळावर भाष्य केले. जाणीवपूर्वक गाडेकर नावाचा अधिकारी नियम डावलून एलसीबीमध्ये आणण्यात आला. याबाबतची तक्रार निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर त्यांची मुंबईला उचलबांगडी झाली.
मात्र त्यानंतरही हा अधिकारी आताही नांदेडमधूनच सूत्रे हलवित असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. जिल्ह्याची कायदा, सुव्यवस्था राखणे महत्त्वाचे असताना सत्तेच्या बळावर पोलीस दलात हस्तक्षेप कशासाठी? असा प्रश्नही त्यांनी केला. वाळू माफिया मोकाट झाले आहेत. सत्तेतल्या लोकांशी त्यांचे साटेलोटे आहे. वाळूचेही मोठे रॅकेट भेदण्यासाठी विभागीय आयुक्तांना जिल्हा प्रशासनाला माहिती न देता चौकशीसाठी पथक पाठवावे लागते. हे कशाचे द्योतक आहे? राजकीय पाठिंब्याशिवाय ही माफियागिरी फोफावत नाही. आता वाळूमधील हाच पैसा प्रचारामध्ये वापरला जात आहे. रिंधा नावाचा कुख्यात दहशतवादी नांदेडमधील डॉक्टर्स, वकील, खाजगी क्लासेसवाले यांना खुलेआम धमक्या देत आहे. नगरसेवकाच्या वडिलावर नुकताच गोळीबार झाला. कोकुलवार यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत.
नांदेड जिल्ह्यात हे काय सुरू आहे? सत्ताधाऱ्यांच्या पोलीस यंत्रणेतील हस्तक्षेपामुळेच रिंधासारख्या व्यक्ती पोलिसांना जुमानत नसल्याचे चित्र आहे. या सर्व बाबीबाबत येणाऱ्या काळात विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे ते म्हणाले. नांदेडची वेगळी ओळख राहिलेली आहे. शिक्षणासह विविध क्षेत्रांबाबत नांदेड जिल्ह्याकडे सन्मानाने पाहिले जाते. ही ओळख पुसण्याचे काम सत्तेच्या मस्तीत सुरु झाले आहे. मात्र हे कदापि होऊ देणार नाही. या विरोधात सर्व पातळ्यांवर लढेल. जनतेनेही अशा प्रवृत्तीविरोधात उठाव करावा, असे आवाहनही अशोक चव्हाण यांनी यावेळी केले.
पीएमसीप्रमाणे जिल्हा बँकेतही गैरव्यवहारपीएमसी अर्थात पंजाब महाराष्ट्र बँकेचा घोटाळा उघडकीस आला आहे. या बँकेच्या संचालक मंडळात मोठ्या संख्येने भाजपचीच मंडळी आहेत. त्यामुळेच ठोस कारवाई करण्यास शासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. नुकताच एका आंदोलनकर्त्या खातेदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मात्र या गंभीर घटनेनंतरही सरकार ढीम्म आहे. असाच गैरव्यवहार नांदेड जिल्हा बँकेतही झाल्याचा खळबळजनक आरोप चव्हाण यांनी केला. जिल्हा बँकेची मालमत्ता निविदेपेक्षा कमी दराने माफिया समूहाच्या माध्यमातून विकल्या गेली. ती कोणी घेतली, हे तपासा. या मालमत्तेचे पैसे पूर्णपणे अजूनही भरले गेले नसल्याचे सांगत डीसीसीच्या कारभारात गंभीर स्वरूपाच्या अनियमितता असल्याचे सांगत यासंदर्भात बँकेने खुलासा करावा असे ते म्हणाले.
काँग्रेसच्या जागा निश्चित वाढतीलनिवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातून चांगले रिपोर्ट मिळत आहेत. काँग्रेसची परिस्थिती सुधारली आहे. त्यामुळे विधानसभेत काँग्रेसच्या समाधानकारक जागा वाढलेल्या दिसतील, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला. विरोधक सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्याचे ते म्हणाले.