नांदेड : नांदेड दक्षिणच्या बुरुजाला विधानसभा निवडणुकीत बंडखोरांमुळे मोठे हादरे बसत आहेत़ भाजपाकडून खुद्द महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी राजीनामा देत अपक्ष उमेदवारी दाखल केली़ तर सेनेकडून सहसंपर्क प्रमुख प्रकाश कौडगे हे रिंगणात आहेत़ काँग्रेसला माजी उपमहापौर विनय गिरडेंच्या माघारीने दिलासा मिळाला असला तरी, प्रत्यक्षात गिरडेंनी आपली भूमिका अद्याप जाहीर केली नाही़ त्यामुळे या मतदारसंघात सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे़
शिवसेनेला सर्वात सेफ वाटणारा हा मतदारसंघ असल्यामुळे हेमंत पाटील यांनी आपल्या सौभाग्यवतीच्या उमेदवारीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती़ तर भाजपाही हा मतदारसंघ सोडवून घेण्याची तयारीत होता़ त्यात ही जागा सेनेला सुटल्यानंतर कंदकुर्तेंनी बंडखोरीची तलवार उपसली़ मागील निवडणुकीत कंदकुर्तेंचा थोडक्या मतांनी पराभव झाला होता़ परंतु यावेळी ते अपक्ष म्हणून रिंगणात आहेत़ काँग्रेसलाही बंडाळीची लागण झाली़ उपमहापौर विनय गिरडे यांनी उमेदवारी मागे घेतली़ परंतु, भूमिका स्पष्ट केली नाही़ आजघडीला तरी, मोहन हंबर्डे यांना गिरडेंच्या माघारीमुळे दिलासा मिळाला आहे़ तर नगरसेवक साबेर चाऊस यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा देत एमआयएमच्या पतगांची दोर हाती धरली़ त्यामुळे या ठिकाणी वंचितकडून असलेल्या फारुख अहमद यांच्या मार्गातील अडचणीत वाढ झाली आहे़ पाचही उमेदवारांमध्ये मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे विजयी होणाऱ्या उमेदवाराचे मताधिक्य हे अतिशय कमी राहण्याची शक्यता आहे़ प्रचारासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत़ त्यामुळे कमी वेळेत उमेदवार किती मतदारापर्यंत पोहोचतो हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे़
मतदारसंघातील प्रमुख प्रश्नगेल्या अनेक वर्षांपासून गोदावरीच्या प्रदूषणाचा प्रश्न रखडला आहे़ पर्यावरणमंत्री असलेल्या पालकमंत्री रामदास कदम यांनी गोदावरीच्या स्वच्छतेसाठी २२ कोटींचा निधी मंजूर केला़ परंतु अद्यापही या कामाला सुरुवात झाली नाही़ त्यामुळे गोदावरीच्या प्रदूषणामध्ये वाढच होत आहे़ दक्षिण मतदारसंघात मुख्य प्रश्न रस्त्यांचा़ शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून या भागात अद्यापही रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात अपयशच आले आहे़ सध्या असलेल्या रस्त्यांची अवस्थाही वाईट आहे़ दक्षिण नांदेड मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून एकही मोठा नवीन उद्योग आला नाही़ एमआयडीसी भागातील अनेक उद्योग बंद पडले आहेत़ त्यामुळे नांदेडातील बेरोजगारांना कामाच्या शोधात मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागते़ त्यामुळे मतदारसंघात नवीन उद्योग धंद्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे़
2०14चे चित्रहेमंत पाटील (सेना-विजयी) दिलीप कंदकुर्ते (भाजपा-पराभूत)
राजश्री पाटील (शिवसेना)- यापूर्वी राजश्री पाटील यांचे पती हेमंत पाटील यांनी मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे़- महिला उमेदवार अन् उत्कृष्ट वक्तृत्वशैली, सर्वसामान्यांमध्ये लगेच मिसळणे़- दक्षिण मतदार संघात शिवसेनेचे संघटन मजबूत आहे़ त्याचा लाभ होवू शकतो़
मोहन हंबर्डे (काँग्रेस)- स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार म्हणून मतदारसंघात ओळख - ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क़ सर्वच समाजात ऊठबस- सेना-भाजप आणि वंचित- एमआयएमच्या मतविभाजनात हंबर्डे यांना होवू शकतो फायदा़ काँग्रेसचा मुस्लिम मतदारांवर प्रभाव
दिलीप कंदकुर्ते (अपक्ष)- २०१४ च्या निवडणुकीतील पराभवानंतरही मतदारसंघात सक्रिय राहिले़- शहरी भागात कंदकुर्तेचा चांगला जनसंपर्क, व्यापारी वर्गातही ऊठबस- बंडखोरही कंदकुर्तेला रसद पुरवू शकतात़ मागील निवडणुकीचा अनुभव पाठीशी़
फारुख अहमद (वंचित आघाडी)- कम्युनिस्ट चळवळीतील कार्यकर्ता म्हणून फारुख अहमद यांची ओळख- फारुख अहमद हे अभ्यासू व्यक्तिमत्त्व असून सर्वच समाजात त्यांचा जनसंपर्क आहे.- लोकसभा निवडणुकीत वंचित उमेदवाराला मिळालेली मते ही जमेची बाजू़