- विशाल सोनटक्के
नांदेड : उमेदवारी मागे घेण्यासाठीचा सोमवारचा दिवस वादळी ठरला होता़ जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांत तब्बल १९२ जणांनी माघार घेतली होती़ त्यामध्ये सर्वच पक्षातील बंडखोरांचाही समावेश होता़ बंडखोरांच्या माघारीने पक्षीय उमेदवारास दिलासा मिळाला असला तरी, माघार घेतलेले हे बंडखोर नेमकी काय भूमिका घेतात, याबाबत धाकधूक कायमच आहे़ काही बंडखोरांनी तर माघारीनंतर आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला पाडण्याचा विडा उचलला आहे़
नांदेड दक्षिण मतदारसंघात शिवसेनेच्या राजश्री पाटील, भाजपचे दिलीप कंदकुर्ते, काँग्रेसकडून मोहन हंबर्डे, वंचितचे फारुख अहमद आणि एमआयएमचे साबेर चाऊस हे रिंगणात आहेत़ परंतु या ठिकाणी सेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रकाश कौडगे यांनी उमेदवारी दाखल केली़ त्यांची उमेदवारी अद्यापही कायम आहे़ त्यामुळे राजश्री पाटील यांची डोकेदुखी वाढली आहे़ तर भाजपचे महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते हेही रिंगणात आहेत़ त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतविभाजनाची शक्यता नाकारता येत नाही़ या मतदारसंघात माजी उपमहापौर विनय गिरडे, भाजपाचे बालाजी पुयड यांनी माघार घेतली आहे़ परंतु हे दोघेही काय भूमिका घेतात़ याबाबत राजश्री पाटील, दिलीप कंदकुर्ते अन् मोहन हंबर्डे या तिघांनीही धाकधूक आहे़ नांदेड उत्तरमध्येही सेनेचे बालाजी कल्याणकर यांच्या विरोधात भाजपचे मिलिंद देशमुख आणि बंडू पावडे यांनी उमेदवारी दाखल केली होती़ या दोघांनीही माघार घेतली़ परंतु अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केली नाही़
हदगावमध्ये काँग्रेसचे गंगाधर पाटील चाभरेकर यांनी शेवटच्या क्षणी रिंगणातून माघार घेतली़ या ठिकाणी काँग्रेसकडून माधव पवार हे रिंगणात आहेत़ चाभरेकर आणि पवार यांच्यात तिकीट मिळविण्यासाठी चाललेली चुरस सर्वश्रुत आहे़ त्यामुळे चाभरेकर आता पवार यांचा प्रचार करतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे़ लोहा मतदारसंघात प्रवीण पाटील चिखलीकर यांना तिकीट मिळाले नाही़ या ठिकाणी चिखलीकरांचे मेहुणे श्यामसुंदर शिंदे शेकापकडून रिंगणात आहेत़ त्यामुळे येथे चिखलीकर युती धर्म पाळत सेनेच्या मुक्तेश्वर धोंडगेचा प्रचार करतील का, अशी चर्चा सुरु आहे़ तर मुक्तेश्वर धोंडगेचे वडील माजी खा़ केशवराव धोंडगे हे शेकापचे जुने नेते आहेत़ त्यामुळे मुलगा की पक्ष असा पेच त्यांच्यासमोर असणार आहे़
किनवटमध्ये भीमराव केराम यांच्याविरोधात संध्या राठोड, ज्योती खराटे आणि धरमसिंह राठोड या तिघांनीही उमेदवारी मागे घेतली़ काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी बंडखोरांनी बैठक घेऊन आपल्यातून एक उमेदवार रिंगणात ठेवण्याचा निर्णय घेतला होता़ परंतु आता त्यांच्या माघारीनंतर केराम यांच्या प्रचारात ते किती सक्रिय होतात़ याबाबतही चर्चा सुरु आहे़ भोकर मतदारसंघात सेनेचे तालुकाप्रमुख अमोल पवार यांनी उमेदवारी मागे घेतली आहे़ या ठिकाणी भाजपच्या निष्ठावंतांकडूनही नाराजीचा सूर आळवण्यात येत आहे़ आयात उमेदवार लादल्याबाबत भाजपच्या इच्छुकांनी उघडपणे संतप्त भावनाही व्यक्त केल्या होत्या़
पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने घेतली माघारबंडखोर उमेदवारांनी आपल्याला तिकीट न मिळाल्याने उमेदवारी अर्ज दाखल केले होते़ परंतु पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर यातील काही जणांनी माघार घेतली़ परंतु उमेदवारी मिळालेल्या उमेदवारासोबत त्यांचे मनोमीलन झाले काय? हा खरा प्रश्न आहे़ त्यामुळे माघार घेतल्याने आजघडीला उमेदवाराला दिलासा मिळाला असला तरी, प्रत्यक्षात त्याचा मतदानासाठी काही फायदा होतो काय? हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे़