- अनुराग पोवळे
नांदेड : जिल्ह्यातील नऊ मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सोमवारी रात्री उशिरापर्यंत ईव्हीएम मशिन स्ट्राँग रुममध्ये पोहचविण्यात आले असून या ईव्हीएमला त्रिस्तरीय सुरक्षा कवच राहणार आहे. यामध्ये केंद्रीय राखीव दलाच्या जवानासह, राज्य राखीव दल आणि स्थानिक पोलिसही सुरक्षा व्यवस्थेत तैनात करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील २ हजार ९६२ मतदान केंद्रावर सोमवारी सकाळी ७ वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. जवळपास ७० टक्के मतदान या प्रक्रियेत झाले. मतदानानंतर कडक सुरक्षा व्यवस्थेत ईव्हीएम मशिन स्ट्राँग रुममध्ये आणण्यात आल्या आहेत. स्ट्राँग रुममध्ये या मशिनच्या संरक्षणासाठी केंद्रीय राखीव दलाच्या कंपन्या तसेच राज्य राखीव दलाच्या कंपन्याही नियुक्त करण्यात आल्या आहेत. या मशिनला अंतर्गत सुरक्षाही सेंट्रल आर्म फोर्सची राहणार आहे. त्यानंतर राज्य राखीव दलाचे जवान नियुक्त करण्यात आले आहेत तर स्ट्राँग परिसरात स्थानिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
प्रत्येक स्ट्राँग रुमला २४ तास बंदोबस्त राहणार असून दोन पाळ्यामध्ये प्रत्येकी एक उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह एक पोलीस निरीक्षक आणि २८ कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. सर्व मतदार संघात अशीच बंदोबस्त रचना असल्याचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सांगितले.या स्ट्राँग रुममध्ये आयोगाकडून परवानगी असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाच येथे पूर्ण तपासणीनंतरच प्रवेश दिला जाईल. इतर कोणालाही येथे प्रवेश मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत. जवळपास ६० तास ईव्हीएम मशिनची सुरक्षा करावी लागणार आहे.
निकालासाठी दोन दिवसांची प्रतीक्षासोमवारी मतदान झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत मतदान अधिकारी, कर्मचारी ईव्हीएम मशिन स्ट्राँग रुममध्ये पोहोचवतील. सोमवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस बंदोबस्तात या ईव्हीएम मशिन स्ट्राँगरुममध्ये आणण्यात येत होत्या. मंगळवार आणि बुधवार हे दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. गुरुवारी सकाळी मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती तसेच सुरक्षा व्यवस्थेचा आराखडा अंतिम केला जात आहे.