नांदेड : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक इच्छुकांनी उमेदवारी दाखल केली होती़ एकट्या भोकर मतदारसंघात १३४ जणांनी अर्ज भरले होते़ अशीच परिस्थिती इतर मतदारसंघातही होती़ सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आलेले अनेक अपक्ष उमेदवार भरलेले डिपॉझिट कधी परत मिळणार? याबाबत अधिकाऱ्यांकडे चौकशी करीत होते़ त्यामुळे निवडणूक विभागाचे अधिकारीही बुचकाळ्यात पडले होते़
विधानसभा निवडणुकीत खुल्या प्रवर्गासाठी दहा हजार रुपये तर राखीव मतदारसंघासाठी पाच हजार रुपयांची अनामत रक्कम भरावी लागते़ जिल्ह्यातील नऊ मतदार संघात अनेक इच्छुकांनी अनामत रक्कम भरत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते़ उमेदवारी दाखल केल्यानंतर प्रतीक्षेत असलेल्या अनेक उमेदवारांचा भ्रमनिरास झाला़ त्यानंतर सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात या उमेदवारांनी माघार घेण्यासाठी गर्दी केली होती़ नऊ मतदारसंघातून तब्बल १९२ जणांनी माघार घेतली़
माघार घेण्यापूर्वी अनेक उमेदवारांनी भरलेली अनामत रक्कम कधी परत मिळणार म्हणून अधिकाऱ्यांना भंडावून सोडले़ त्यामुळे अधिकारीही बुचकाळ्यात पडले़ यावेळी उमेदवारासोबत आलेल्या एका महाभागाने उमेदवारी मागे घेण्याच्या अर्जावरही स्वाक्षरी करण्याचा प्रयत्न केला़ यावेळी अधिकाऱ्याने त्याला अडविले़