नांदेड : निकालामुळे कार्यकर्त्यांसह माझी निराशा झाली. मात्र हा पराभव मी खुल्या मनाने मान्य करीत असून, प्रदेशाध्यक्ष म्हणून पराभवाची नैतिक जबाबदारीही स्वीकारत आहे. यापुढे पक्ष ठरवेल, आदेश देईल त्याप्रमाणे पक्ष बांधणीचे काम करु, असे सांगत लोकसभा निवडणूक निकालांचा आगामी विधानसभा निवडणुकांवर प्रभाव दिसणार नाही, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.
अनेकांना सत्तेशिवाय राहता येत नाही. आम्ही कधीही पक्ष सत्तेत आहे की नाही, याचा विचार केला नाही. कार्य करीत असताना पक्षाचे हित ध्यानात घेऊनच निर्णय घेतले. मात्र तरीही काही चुका झाल्या असतील. कार्यकर्त्यांसह अनेकांच्या अपेक्षा असतात. काहींचे व्यक्तिगत हित राखण्यात कदाचित कमी पडलोही असेन. मात्र याबाबत अधिक बोलणार नाही. पराभवाने निराश न होता यापुढील काळात अधिक मेहनत घेऊन पुन्हा पक्ष बांधणी करु, असे त्यांनी सांगितले. पराभवाची कारमिमांसा, आत्मपरीक्षण करावे लागेल. राज्यातील उमेदवारनिहाय आकडेवारी हाती आल्यानंतर ठोस निष्कर्षापर्यंत जाता येईल. त्यानंतर सामूहिकपणे काही निर्णय घ्यावे लागतील. मात्र एक खरे की, एका पराभवामुळे कायमस्वरुपी देश भाजपाकडे सोपविला, असे मानायचे कारण नाही. पक्ष बांधणी करुन काँग्रेस पुन्हा उभारी घेईल, असा विश्वासही अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.