नांदेड : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. मात्र अद्यापही शिवसेना-भाजपाची युती होणार की नाही याबाबत साशंकता आहे. या निर्णयाकडे जिल्ह्यातील दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे लक्ष लागले असतानाच दुसरीकडे भाजपासह शिवसेनेनेही वेळ पडल्यास स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सर्व नऊही मतदारसंघात केली आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणार हे निश्चित झाल्याने या दोन्ही पक्षांकडून उमेदवार निवडणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. पुढील एक-दोन दिवसात काँग्रेसचीही पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी नांदेड दौऱ्यात कार्यकर्त्यांना ताकदीने सेना-भाजपाचा सामना करण्याचे आवाहन करीत येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी नव्याने उभी राहिलेली दिसेल, असा विश्वास दिला. काँग्रेस नेते अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसकडूनही विधानसभेची जय्यत तयारी सुरू असतानाच शिवसेना-भाजपा पदाधिकाऱ्यांत मात्र अद्यापही संभ्रमाचे वातावरण कायम आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते युती होईल, असा विश्वास देत असले तरी या दोन्ही पक्षांचा फॉर्म्यूला अद्याप निश्चित झालेला नसल्याने जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांत संभ्रम कायम आहे. एकीकडे युतीची भाषा बोलली जात असतानाच भाजपासह शिवसेनेनेही जिल्ह्यात स्वबळाची तयारीही केल्याचे दिसून येत आहे.
नांदेड-उत्तर मतदारसंघात विद्यमान आमदार डी.पी. सावंत काँग्रेसकडून पुन्हा रिंगणात राहण्याची शक्यता आहे. भाजपाकडून तेथे मिलिंद देशमुख यांचे नाव चर्चेत आहे. शिवसेनेकडूनही उमेदवारीच्या अनुषंगाने चाचपणी सुरू आहे. नांदेड-दक्षिण मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. येथून शिवसेनेतर्फे राजश्री पाटील रिंगणात उतरण्याची तयारी करीत आहेत तर भाजपाकडून दिलीप कंदकुर्ते आणि संतुक हंबर्डे यांचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस या मतदारसंघातून कोणाला संधी देते? याबाबत उत्सुकता आहे.
कंधार-लोहा मतदारसंघाकडेही जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. शिवसेनेकडे असलेली ही जागा भाजपा मागत असून येथून प्रविण पाटील चिखलीकर रिंगणात उतरु शकतात. शिवसेनेतर्फे अॅड. मुक्तेश्वर धोंडगे यांचे नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादीकडून शंकरअण्णा धोंडगे यांचे नाव अंतिम होण्याची चिन्हे आहेत. या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा संकल्प करुन प्रचाराला लागलेले श्यामसुंदर शिंदे ऐनवेळी काय भूमिका घेतात यावर कंधार विधानसभा मतदारसंघाचे गणित अवलंबून असणार आहे.
नायगाव विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार वसंतराव चव्हाण यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. भाजपामध्ये राजेश पवार आणि डॉ. मिनल खतगावकर यांच्यात तिकिटसाठी रस्सीखेच सुरू आहे. हदगावमध्ये शिवसेनेकडून विद्यमान आमदार नागेश पाटील आष्टीकर यांची निवडणूक तयारी पूर्ण झाली आहे. येथे काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळते याबाबत उत्सुकता आहे. माधवराव पाटील जवळगावकर आणि गंगाधर पाटील चाभरेकर या दोन इच्छुकात कोण बाजी मारते? हे पहावे लागणार आहे.
भोकर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून अशोक चव्हाण रिंगणात उतरतील तर भाजपाकडून बापुसाहेब गोरठेकर हेही प्रचाराला लागले आहेत. युती न झाल्यास शिवसेनाही येथे उमेदवार देवू शकतो. माहूर-किनवट मतदारसंघात विद्यमान आमदार प्रदीप नाईक यांनी प्रचाराला वेग दिला आहे. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच त्यांची प्रचाराची पहिली फेरीही पूर्ण झाली आहे. येथून भाजपातर्फे धरमसिंग राठोड आणि संध्या राठोड यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेतर्फे ज्योतिबा खराटे आणि सचिन नाईक या नावांची चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रा. हेमराज उईके निवडणुकीची तयारी करीत आहेत.
देगलूर-बिलोली मतदारसंघात विद्यमान आमदार सुभाष साबणे यांच्या विरोधात भाजपातर्फे भीमराव क्षीरसागर यांच्यासह मारोती वाडेकर इच्छुक आहेत. क्षीरसागर यांनीही प्रचार सुरू केला आहे. तर काँग्रेसतर्फे रावसाहेब अंतापूरकर हेच पुन्हा रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघात यंदा भाजपामध्येच चुरस दिसून येत आहे. विद्यमान आ. डॉ. तुषार राठोड यांनी तयारी सुरू केली असली तरीही भाजपातर्फे येथून रामदास पाटील, व्यंकटराव गोजेगावकर यांनीही तिकिटाची जोरदार मागणी लावून धरली आहे. रामदास पाटील यांनी रिंगणात उतरावे, यासाठी भाजपा पदाधिकारी आग्रही आहेत. या मतदारसंघातून काँग्रेस कोणाला संधी देते याबाबत उत्सुकता आहे. शिवसेना स्वतंत्र लढल्यास बालाजी पाटील कार्लेकर यांना निवडणुकीची संधी मिळू शकते. एकूणच युतीची चर्चा सुरू असली तरी सर्वच नऊही मतदारसंघात भाजपाबरोबरच शिवसेनेनेही स्वबळाची तयारी ठेवली आहे.
...तर नऊही मतदारसंघात बहुरंगी लढतीच्शिवसेना-भाजपा यांची युती होते की नाही? यावर जिल्ह्यातील नऊही मतदारसंघातील लढतीचे चित्र अवलंबून असणार आहे. हे पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढल्यास जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात बहुरंगी लढती होण्याची शक्यता असून त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील चुरस मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. भाजप-शिवसेना आणि काँग्रेस या प्रमुख पक्षाबरोबर वंचित आघाडीचा उमेदवारही रिंगणात असणार आहे. याबरोबरच मोठ्या संख्येने इच्छुक असलेल्या उमेदवारांना थोपविण्याचे आव्हानही सेना-भाजपासोबत असणार आहे.