गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
हदगाव - तालुक्यातील पिंगळी येथे शिवजयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच अशोकराव पालकर, उपसरपंच निलाबाई भोसले, ग्रा.पं. सदस्य देवराव पोटबांधे, शोभाबाई गव्हाणे, रंजनाबाई इंगळे, गजानन मोरे, निशीकांत कोल्हे, शितल मुपटे यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय विज्ञान दिन
बिलोली - सगरोळी येथे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला विज्ञानाचे शिक्षक पांडुरंग कदम यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन कु.करीश्मा शेख हिने तर आरती पाटील हिने आभार मानले.
तांब्याची तार लंपास
नांदेड - नांदेड तालुक्यातील तळणी शिवारातून ६० हजार रुपयांची तांब्याची तार लांबविण्यात आल्याची घटना २८फेब्रुवारी रोजी रात्री घडली. तळणी शिवारातील गट क्र.४९ मधील २५ केव्ही क्षमतेचा डीपी फोडून त्यातील तांब्याची तार लांबविण्यात आली. या प्रकरणी लिंबगावचे सहाय्यक अभियंता उत्तम सूर्यतळे यांनी फिर्याद नोंदवली.
रोहीत्र जळाल्याने अंधार
हदगाव - हस्तरा ता.हदगाव येथील डीपी जळाल्याने गेल्या चार दिवसांपासून गाववासीय अंधारात आहेत. याशिवाय विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्या, दळणाची समस्या आदींमुळे नागरिक वैतागले आहेत. ऐन परीक्षेच्या काळात लाईट बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
खानापूर येथे स्वच्छता अभियान
देगलूर - संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत खानापूर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी गौतम वाघमारे, अशोक डुकरे, मोहनराव कदम, संभाजी मारजवाडे, गौसमियासाब, किशन इबितवार, राम इबितवार, हणुमंत इबितवार आदी उपस्थित होते.
गुरु रविदास जयंती
नायगाव - नायगाव तालुक्यातील नरसी येथील गुरु रविदास महाराजांची जयंती ७ मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक भगवानराव भिलवंडे तर उद्घाटक म्हणून श्रावण पाटील भिलवंडे व प्रमुख वक्ते म्हणून चंद्रप्रकाश देगलूरकर यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमासाठी सचिव हणमंत गंगासागरे, उपाध्यक्ष माधव गंगासागरे, भारत गंगासागरे, भास्कर गंगासागरे, ज्ञानेश्वर गंगासागरे आदी परिश्रम घेत आहेत.
जाधव यांना निराेप
बिलोली - जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखाधिकारी व्यंकटराव जाधव सेवानिवृत्त झाल्याने त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. कार्यक्रमाला जि.प. सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड, कमलकिशोर पाटील, गंगाधरराव सरकुलवार, दत्ता पाटील जिगळेकर आदी उपस्थित होते. नूतन शाखाधिकारी डी.डी. देशमुख यांनी सूत्र स्वीकारले.
पाणपोईचे उद्घाटन
मुखेड - शहरातील बसवेश्वर चौकात पाणपोई सुरू करण्यात आली. पालिकेतील गटनेते माधव पाटील व भाजयुमोचे शहराध्यक्ष प्रकाश बल्फेवाड यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विलास मैड, बालाजी बादलवाड, अमोल आबादार, सचिन चंद्रे, सचिन माने, विठ्ठल आचार्य, राहुल कोठेवार आदी उपस्थित होते.
हरभरा खरेदीचा शुभारंभ
हदगाव - येथील खरेदी विक्री संघाच्या वतीने माजी आ. नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते शासकीय हरभरा खरेदीचा शुभारंभ झाला. यावेळी सहाय्यक निबंधक चंद्रकांत मगर, चेअरमन बळीराम देवकत्ते, व्हाईस चेअरमन विनायकराव कदम आदी उपस्थित होते. तसेच डॉ.संजय पवार, श्यामराव पवार, संचालक प्रभाकर पत्तेवार आदींचीही उपस्थिती होती.