किनवट तालुक्यात १३४ ग्रामपंचायती असताना १०६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण पूर्वीप्रमाणेच ठेवून २८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या सोडतीनंतर ६९ ग्रामपंचायतींवर महिलाराज येणार आहे.
किनवट तालुक्यात १३४ ग्रामपंचायती असून, त्यातील १०३ ग्रामपंचायती या अनुसूचित क्षेत्रातील आहेत. त्यापैकी ५१ ग्रामपंचायतीत आदिवासी पुरुष व ५२ ग्रामपंचायतीत अनुसूचित जमाती महिला सरपंच होणार आहेत. तीन ग्रामपंचायतीत अनुसूचित जातीचे सरपंच होतील, तर पाच ग्रामपंचायतीत ओबीसी महिला व दहा ग्रामपंचायतीत सर्वसाधारण प्रवर्गातील दहा महिला सरपंच होतील. १३४ ग्रामपंचायतींपैकी ६९ ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे महिलांच्या हाती राहणार आहे.
जेथे जेथे महिलाराज तेथे तेथे सरपंचाचे पती किंवा नातेवाईक पाहतात ग्रामपंचायतीचे कामकाज असेच दरवेळचे चित्र आहे. ६५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचा कारभार हा पुरुषांच्या हाती राहणार आहे, त्यात एखाद्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी अर्ज दाखल केला तर तिथेही महिला सरपंच होऊ शकतात.
अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ५२ ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षित असून, अनुसूचित जातीच्या महिलेसाठी इस्लापूर व रिठा या दोन ग्रामपंचायतीच्या आरक्षित झाल्या आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी महिलेसाठी) वाळकी (बु), मानसिंगनाईक तांडा, अंबाडीतांडा, गोंडेमहागाव, भिसी या पाच ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांकडे राहणार आहे. सर्वसाधारण ( खुला) पांगरपहाड, मलकजांब, कोसमेट, आंदबोरी (ई), शिवणी, फुलेनगर, दीपलानाईकतांडा, मोहाडा, बुधवारपेठ, रोडानाईकतांडा या ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी राखीव आहे.