परळी-माहूर (क्र.एमएच २० बी.एल. ४०१५) ही बस माहूरच्या एसटी आगारात २५ फेब्रुवारी रोजी रात्री उभी केलेली होती. सदर बसची माहूरहून परळीकडे रवाना होण्याची वेळ सकाळी ७:३०ची असल्याने शुक्रवारी सकाळी ६च्या सुमारास आगारातील स्वच्छता कर्मचारी बस स्वच्छतेसाठी गेले असता, सदर बसमध्ये गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत वाहक संजय जानकर आढळून आले. आगारप्रमुख व्ही.टी. धुतमल यांनी ही माहिती तातडीने पोलिसांना दिली. माहूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांनी घटनास्थळी भेट दिली. कॉ.गंगाधर खामनकर, प्रकाश देशमुख आदींनी पंचनामा केला व प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय माहूर येथे पाठविले. तेथे डॉ.विजय मोरे यांनी प्रेताचे शवविच्छेदन केले.
सदर वाहकाच्या गाडीची तपासणी पथकाने २४ रोजी धनोडा येथे केली होती. त्यावेळी काही प्रवाशांचे तिकीट निघाले नसल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणी कारवाई होण्याच्या भीतीतूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. आत्महत्येपूर्वी सुसाइड नोट लिहून जानकर यांनी ती माहूर आगार व्हॉट्सॲप ग्रुपवर शुक्रवारी पहाटे ४ वाजता टाकल्याचेही पुढे आले आहे. सदर वाहक हा तुटपुंज्या पगारामुळे नेहमी आर्थिक विवंचनेत असायचा, तसेच यापूर्वीही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली होती. त्यात २४ रोजीच्या घटनेमुळे पुन्हा निलंबन झाल्यास कुटुंबाची उपजीविका कशी करायची, या विवंचनेतूनच त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. अधिक तपास कॉन्स्टेबल विजय आडे हे करीत आहेत.
चौकट.........
सुसाइड नोटमध्ये मांडली व्यथा...
संजय जानकर यांनी आत्महत्येपूर्वी सुसाइड नोट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी तिकीट यंत्राचा वाहकांना कसा फटका सोसावा लागतो, याबाबतची व्यथा मांडली आहे. राज्यभरातील एसटीचे वाहक नादुरुस्त ईटीआयएम मशीनद्वारे आपली कामगिरी बजावत आहेत. खोट्या अहवालाने निलंबित व सेवेतून बडतर्फ होत आहेत. मी २४ रोजी माहूरवरून महागावसाठी साडेतीन प्रवासी घेतले. मात्र, यंत्रातील बिघाडामुळे साडेतीनऐवजी एक तिकीट प्रिंट झाले. तेही अपंगांसाठी असलेले तिकीट बाहेर आले. हा प्रकार सुरू असतानाच, धनोडापर्यंत गाडी पोहोचली आणि पथकाने तिकीट तपासणी सुुरू केली. या प्रकरणी माझ्यावर केस दाखल झाली. मला निलंबितही केले जाईल. मात्र, मशीन योग्य असती, तर तिकीट योग्य निघाले असते, असे त्यांनी या सुसाइड नोटमध्ये नमूद केले आहे.
फोटो नं.२६एनपीएचएफईबी-०१.जेपीईजी.
फोटो कॅप्शन - माहूर आगारात थांबलेल्या बसमध्येच वाहकाने आत्महत्या केल्याचे शुक्रवारी पहाटे निदर्शनास आल्यानंतर माहूर आगारासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.