नांदेड : आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर सध्या सुनावणी सुरू आहे. पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन हे कोणत्याही एका पक्षापुरते मर्यादित नसून, त्याचे आगामी काळात दूरगामी परिणाम होणार आहेत. त्यामुळे कायद्यातील तरतुदींचा विचार करून उचित निर्णय घेण्यात येईल, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.
चव्हाण म्हणाले, पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदी लक्षात घेऊन निर्णय व्हायला पाहिजे. पक्षांतर झाल्यामुळे किंवा पक्षच्या पक्ष चालल्याने बहुतांश आमदार पक्षांतर बंदी कायद्याची पर्वा करीत नसल्याचे दिसून येत आहे. पक्षांतर हा केवळ एका पक्षाचा विषय नसून आगामी काळात त्याचे दुष्परिणाम होणार आहेत. लोकशाही टिकविण्यासाठी याबाबतच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत, ही चांगली बाब आहे. मराठा आरक्षणाच्या विषयावरून समाजाच्या भावना तीव्र आहेत. आमचीही तीच भूमिका आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महिन्यात हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन आता त्यांनी पूर्ण करावे, असेही चव्हाण म्हणाले.