जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर औषधोपचार व वापरण्यात आलेले पीपीई किट व इतर साहित्य जैविक कचरा नियमित पडत असतो. या जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यापूर्वी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने अमलात आणलेल्या ॲपवर जाऊन नोंद करण्याचे बंधन घातलेले आहे. सामूहिक जैविक प्रक्रिया प्रकल्पामध्ये विल्हेवाट लावण्याकरिता जो कचरा दिला जातो तो पुन्हा पुनर्वापरात येऊ नये याची दक्षता प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घेण्यात येत आहे.
कोविड रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचीदेखील योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. राज्यात काही ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांसाठी वापरण्यात आलेल्या औषध व इतर साहित्यातील काही रिकाम्या बाटल्यांचा औषधांसाठी पुनर्वापरदेखील झालेला आहे. त्यामुळे भविष्यात नांदेड जिल्ह्यातील कोविड सेंटरवर असा प्रकार घडू नये याची खबरदारी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घेण्यात येत आहे. जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यापूर्वी ‘सीपीसीबी’ ॲपवर संबंधित कोविड सेंटरने जैविक कचऱ्याची नोंद करणे आवश्यक आहे.
चौकट---------------
नियम न पाळणाऱ्या खासगी रुग्णालयांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील
खासगी कोविड रुग्णालय (सेंटर) मधील कोरोनाबाधित रुग्णांसाठी वापरण्यात आलेले साहित्य व औषधी या जैविक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ ‘सीपीसीबी’ ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. जे खासगी कोविड सेंटर नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील. किंबहुना त्यांचे परवानेदेखील रद्द करण्याची कारवाई होऊ शकते याची नोंद खासगी रुग्णालयांनी घ्यावी.
- राजेंद्र पाटील,
उपप्रादेशिक अधिकारी,
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नांदेड