नांदेड : महापालिकेत एकहाती सत्ता मिळविलेल्या काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच महापौर बदलाचे वारे वाहू लागले आहेत़ नव्या पदाधिकारी निवडीत लोकसभा निवडणुकीत कोणत्या प्रभागातून काँग्रेसला जास्त लीड मिळाली याचा प्रामुख्याने विचार केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले़२०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला एकहाती बहुमत मिळाले होते. ८१ पैकी तब्बल ७३ जागा काँग्रेसला मिळाल्या. भाजपाला ६ आणि एक शिवसेना व एक अपक्ष निवडून आले होते. महापौर निवड १ नोव्हेंबर २०१७ रोजी झाली होती. त्यात शीलाताई किशोर भवरे यांची महापौरपदी तर उपमहापौरपदी विनय गिरडे यांची निवड झाली होती. प्रारंभिक महापौर पद हे सव्वा वर्षासाठी राहील, असा निर्णय काँग्रेसने घेतला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वीच महापौर बदलाची मागणी पुढे आली होती. मात्र, लोकसभा निवडणुका लक्षात घेता काँग्रेसने पदाधिकारी बदल प्रलंबित ठेवला.लोकसभेसाठी १८ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान प्रक्रिया पार पडताच काँग्रेसच्या एका गटाने उचल खात महापौर बदलाची मागणी रेटून धरली. या मागणीला काँग्रसश्रेष्ठींनी हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे पुढील हालचालींना वेग आला. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. आचारसंहिता संपताच महापौर शीलाताई भवरे यांचा राजीनामा घेतला जाईल, असे संकेत मिळाले आहेत.नवीन पदाधिकारी निवडीची जबाबदारी माजी राज्यमंत्री आ. डी. पी. सावंत यांच्यावर सोपविली आहे. महापौरपद हे अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. या पदासाठी जवळपास ६ महिला नगरसेवक इच्छुक आहेत. इच्छुकांची संख्या लक्षात घेता आणि आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता नव्या पदाधिकाऱ्यांची निवडही काँग्रेसला जबाबदारीने करावी लागणार आहे. निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी लागणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसला महापौरपदासाठी इच्छुक नगरसेवकांच्या प्रभागातून किती लीड मिळाली, याचा प्रामुख्याने विचार केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत दलित मतदार मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीकडे वळल्याचे चित्र दिसून आले होेते. प्रत्यक्षात त्याचे मतदानात किती रुपांतर झाले, हे २३ मे रोजीच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे इच्छुक नगरसेवकांच्या प्रभागातील कामगिरीचाही महापौर निवडीत विचार केला जाणार आहे.
मनपात पदाधिकारी बदलाचे वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 12:19 AM
महापालिकेत एकहाती सत्ता मिळविलेल्या काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच महापौर बदलाचे वारे वाहू लागले आहेत़ नव्या पदाधिकारी निवडीत लोकसभा निवडणुकीत कोणत्या प्रभागातून काँग्रेसला जास्त लीड मिळाली याचा प्रामुख्याने विचार केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले़
ठळक मुद्देइच्छुकांची फिल्डिंग : प्रभागातील लीडवरच सर्व अवलंबून