नांदेड : सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती़ त्यात नांदेडात या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून शहरातील राज कॉर्नर परिसरात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्यानंतर तूफान दगडफेकीस सुरुवात झाली़ यामध्ये महिलांसह अनेकजण जखमी झाले आहेत़
मंगळवारी सकाळपासूनच शहरातील सर्व बाजारपेठा कडकडीत बंद होत्या़ मराठा समाजातील तरूण दुचाकीवर फिरून नांदेडकरांना प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन करीत होते़ सकाळी १२ वाजेच्या सुमारास आयटीआय चौकात तरुणांनी रास्ता रोको केला़ त्यानंतर दुपारी १़३० च्या सुमारास वर्कशॉप कॉर्नर येथे रास्ता रोको करण्यात येत होता़ यावेळी घटनास्थळी पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी धाव घेतली़ आंदोलकांना त्यांना पांगविण्याचा प्रयत्न केला़ त्यासाठी बळाचा वापर करण्यात आला़
त्यामध्ये काही आंदोलनकर्ते जखमी झाले़ त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी परिसरात तूफान दगडफेक करण्यास सुरुवात केली़ या दगडफेकीत पोलिस अधीक्षक मिना यांच्या वाहनासह इतर अनेक वाहनांचे नुकसान झाले होते़ अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे परिसरात धावपळ उडाली़ दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या निवासस्थानाकडे जाणारे तीनही रस्ते बंद करण्यात आले असून या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे़ त्याचबरोबर आ. हेमंत पाटील यांच्या निवासस्थानीही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे़