नांदेड: नांदेड बंद दरम्यान मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. दुकाने बंद करण्याचे आवाहन करताना पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने चार ते पाच जण जखमी झाले. जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आज नांदेड बंद पुकारण्यात आला होता. नांदेड शहरातील शिवाजी पुतळा येथे सकल मराठा बांधव जमा झाले. दुकाने बंद करण्याचे आवाहन करत असताना राज कॉर्नर येथे मराठा आंदोलकांना अडवण्यात आले. या ठिकाणी पोलीस निरीक्षक शेंडगे आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली.
दुसरीकडे मोर चौक येथे दुकाने बंद करण्याचे आवाहन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्ज मध्ये चार ते पाच मराठा आंदोलक जखमी झाले. पोलिसांनी विनाकारण लाठीचार्ज केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचे कळल्यानंतर मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालय येथे धडकले. मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटमध्ये आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. लाठीचार्जमुळे नांदेडमध्ये वातावरण तणावपूर्ण झाले होते. काही वेळाने तणाव निवळला.