नांदेड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाची धग नांदेड जिल्ह्यात कायम आहे. आज सकाळपासूनच नांदेड - वसमत मार्गावरील निळा येथे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने रास्तारोको करण्यात येत आहे़ तर उमरी तालुक्यात बसवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. तर मुखेड तालुक्यातील आलुवडगाव येथे आंदोलकांनी बस पेटवली.
मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे़ नांदेड शहरात पुकारलेल्या बंदनंतर आंदोलनाच पडसात तालुका, गाव पातळीवर दिसून येत आहेत. आज सकाळी निळा येथील गावकऱ्यांनी रास्तारोको केला असून नांदेड-वसमत आणि नांदेड - एकदरा या दोन मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. रस्त्यावर शेकडो तरूण उतरले असून रस्त्यावर टायर जाळून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे. या मार्गावरील वाहतूक पुयणी मार्गे मालेगाव-वसमत अशी वळविण्यात आली आहे़ लिंबगाव पोलिसांनी घेतलेल्या खबरदारीमुळे वाहनांना पर्यायी मार्ग मिळाला़ त्यामुळे सदर रस्त्यावर कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही़ आंदोलक तरूण निळा येथील वाय पॉर्इंटवर ठिय्या मांडून आहेत. त्याचबरोबर वाहने जावू नये म्हणून आंदोलकांनी रस्त्यावर काट्या आणि झाडाच्या फांद्या टाकल्या आहेत.
दरम्यान, दुसऱ्या घटनेत उमरी तालुक्यात बसच्या काचा फोडण्यात आल्या़ यावेळी आंदोलकांनी आरक्षण आमच्या हक्काचे, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे आदी घोषणा दिल्या़ हंगीरगा येथून उमरीकडे येणाऱ्या बसमधील प्रवाशांना खाली उतरवून एमएच ०६ एस ८७४० या भोकर आगारातील मानव विकास मिशनच्या बसच्या समोरील काचा आंदोलकांनी फोडल्या़ या घटनेनंतर तालुक्यातील बससेवा रद्द करून सर्व बस माघारी आगारात बोलवून घेतल्याचे आगारातील वाहतूक नियंत्रक वागदकर यांनी सांगितले़ आज मंगळवार उमरी येथील आठवडी बाजार असून बससेवा बंद केल्याने प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागला. तसेच आंदोलकांनी आलुवडगाव येथे मुखेड आगाराची बस जाळली.