नांदेड : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्यभरातील मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. नांदेडमध्ये छावा संघटनेने पालकमंत्री मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांना जाब विचारण्यासाठी ढोल बजावो आंदोलन केले.
आंदोलक चव्हाण यांच्या बंगल्याकडे जात असताना पोलिसांनी त्यांना काही अंतरावर रोखले. या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. दरम्यान, आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले असून छावाचे शेकडो कार्यकर्ते चव्हाण यांच्या बंगल्याच्या परिसरात ठिय्या करत आहेत.
अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना पूर्वीपासूनच आक्रमक संघटना म्हणून ओळखली जाते. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यातही आंदोलकांनी शिवाजीनगर येथील चव्हाण यांच्या बंगल्याच्या कॉर्नरपर्यंत जाऊन ठिय्या केला आणि ढोल वाजवून शासन तसेच उपसमिती अध्यक्ष यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील, प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील, केंद्रीय कार्यकारिणीचे भीमराव मराठे, अप्पासाहेब कुडेकर यांच्यासह नांदेड चे जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे, माधवराव ताटे, परमेश्वर जाधव आदी उपस्थित होते.