कोरोनामुळे यंदा अनेकदा विविध कामांना ब्रेक लागला होता. आधी निधी मिळणार की नाही, याची शाश्वती नव्हती. दिवाळीनंतर जिल्हा वार्षिक योजनेचा निधी पूर्णपणे मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राज्य शासनाच्या विविध विभागांनी आपल्या कामांची गती वाढविली होती. त्यामुळे अशा विभागांची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. दरवर्षीपेक्षा एक ते दोन महिने उशिराने निधी खर्चासाठी प्रक्रिया सुरू झाल्याने या विभागांना संचिका तयार करण्यापासून ते अंदाजपत्रके, मोजमाप पुस्तिका आदी कामांना विलंब झाला. त्यामुळे ही कामे आता पूर्ण करून मार्च एण्डपूर्वी देयके सादर करण्याची कवायत करावी लागत आहे. त्यामुळे अनेक विभागांमध्ये शनिवारीही कर्मचारी कामे करताना दिसून येत होते.
दुपारपर्यंत अनेक कार्यालयांत चांगलीच गर्दी होती. त्यानंतर केवळ वित्त विभागातच विविध बाबींची तयारी सुरू असल्याचे दिसून आले. सार्वजनिक बांधकाम विभागातही काही ठराविक लोकांची मोजमाप पुस्तिका व देयके तयार करण्याची लगबग सुरू असल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी कार्यालयातही काही विभागांमध्ये कर्मचारी कामे करत असल्याचे दिसून आले. विशेषत: नियोजन विभागातील कर्मचाऱ्यांची सकाळपासूनच विविध प्रस्तावांसाठी लगबग सुरू होती. अनेक विभागांनी आधीच ही प्रक्रिया पूर्ण करून घेण्याची तयारी केली असल्याचे दिसत आहे.