नांदेड: माओवाद्यांनी शुक्रवारी सकाळी 'छत्तीसगड'मधील नारायणपूर येथे केलेल्या भ्याड हल्ल्यात नांदेड जिल्ह्यातील बामणीचे सुपुत्र असिस्टंट कमांडंट सुधाकर राजेंद्र शिंदे शहीद झाले. आज सकाळी एका विशेष पथक शहीद सुधाकर शिंदे यांचे( Martyr Sudhakar Shinde ) पार्थिव देह रायपूर येथून नागपूरमार्गे नांदेडकडे घेऊन येत आहे. रविवारी ( दि. २२ ) सकाळी ९ वाजता बामणी (ता. मुखेड)येथे शहीद सुधाकर शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नांदेड जिल्ह्यातील बामणी (ता. मुखेड) येथील मुळ रहिवासी सुधाकर शिंदे आयटीबीपी अर्थात इंडो तिबेटीयन बॉर्डरमध्ये असिस्टंट कमांडंट (पोलीस उपाधीक्षक) पदावर कर्तव्यावर होते. शुक्रवारी ( दि. २०) सकाळी असिस्टंट कमांडंट शिंदे छत्तीसगडमधील नारायणपूर येथे रोड ओपनिंगचे कर्तव्य पार पाडत होते. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी असिस्टंट कमांडंट शिंदे यांच्यावर बेछूट गोळीबार केला. दरम्यान, असिस्टंट कमांडंट शिंदे तसेच त्यांचे सहकारी सपोनि. गुरुमुखसिंग यांनी माओवाद्यांना प्रत्युत्तरही दिले. मात्र, माओवाद्यांची संख्या अधिक असल्यामुळे हल्ल्यात असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे व त्यांचे सहकारी ए.पी.आय. गुरूमुखसिंघ शहीद झाले.
रविवारी मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कारशहीद सुधाकर शिंदे यांचा पार्थिव देह शनिवारी सकाळी रायपूर येथून 'आयटीबीपी'च्या एका विशेष पथकासह नागपूरमार्गे नांदेडकडे रवाना झाला आहे. शनिवारी मध्यरात्रीपर्यंत शहीद शिंदे यांच्या मुळगावी बामणी (ता. मुखेड) येथे पार्थिव देह पोहचेल. रविवारी ( दि. २२) सकाळी ९ वाजेदरम्यान बामणी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. अशी माहिती पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांनी दिली.