शिवराज बिचेवार
नांदेड : बिटकॉइन घोटाळ्याचे सूत्रधार भारद्वाज बंधूंनी गुंतवणूकदारांकडून बिटकॉइन घेऊन त्या बदल्यात स्वतःचे 'एम कॅप' हे चलन माथी मारले. त्यावेळी 'एम कॅप'चे बाजारमूल्य केवळ १४ हजार रुपये, तर बिटकॉइनचे ७४ हजार होते. परंतु, हेच एम कॅप जर गुंतवणूकदारांनी भारद्वाजला विक्री केले, तर तो त्या बदल्यात अर्धीच किंमत देत होता.
नांदेडात एमजीएम कॉलेजमधून २००४ साली सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलेल्या अमित भारद्वाज आणि त्याच्या टोळीने देशभरात केलेल्या गेन बिटकॉइन घोटाळा प्रकरणात मार्चमध्ये 'सीबीआय'ने देशभरात छापे टाकले. त्यामुळे नांदेडातून सुरू झालेला हा घोटाळा पुन्हा ऐरणीवर आला. देशभरात भारद्वाजविरोधात गुन्हे दाखल आहेत.
पॉश हॉटेलमध्ये घेतले जात होते सेमिनार
अमित भारद्वाज आणि त्याच्या साथीदारांनी नांदेडातील पॉश हॉटेलमध्ये एम कॅपमध्ये गुंतवणुकीसाठी सेमिनार घेतले होते. त्यापूर्वी बिटकॉइन खरेदीसाठी नांदेडातील अनेकांनी झेब पे या ट्रेड कंपनीचा वापर केला होता. हे बिटकॉइन खरेदी केल्यानंतर ते भारद्वाजकडे देण्यात आले होते.
१०% परतावा दिल्याने विश्वास वाढला
भारद्वाजने गेन बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास महिन्याला १० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेकांकडून बिटकॉइन घेतले होते. सुरुवातीचे तीन महिने त्याने परतावाही दिला. परंतु, त्यानंतर तो टाळाटाळ करू लागला. आयुर्वेदिक कॉलेजच्या प्राध्यापकाला ५५ लाखांचा गंडा घातल्याचे उघडकीस आल्यानंतर घोटाळ्याचे बिंग फुटले.
अटकेनंतर मूल्य घसरले
भारद्वाजने बिटकॉइन ग्रोथ फ्रंट या कंपनीच्या माध्यमातून बिटकॉइन आणि एम कॅप या दोन्ही आभासी चलनाद्वारे हजारो कोटी रुपयांना गंडविले. भारद्वाजला पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर एम कॅपचे मूल्य बाजारात चिल्लर पैशांवर येऊन पोहोचले होते. त्यामुळे लाखो रुपयांचे बिटकॉइन गेले अन् एम कॅपचाही खुर्दा झाला, अशी अवस्था भारद्वाजने गुंतवणूकदारांची केली होती.