मुंबईतील 'मातोश्री' पेक्षा दिल्लीतील 'मातोश्री' अधिक शक्तिशाली झाल्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 05:16 PM2020-01-29T17:16:27+5:302020-01-29T17:20:49+5:30
आजची शिवसेना ही क्षीण झाली आहे
नांदेड : शिवेसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही देश हिताची होती. आजची शिवसेना ही क्षीण झाली असून मुंबई येथील 'मातोश्री'पेक्षा दिल्लीतील 'मातोश्री' अधिक शक्तिशाली झाल्याचा टोमना माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मारला.
नांदेड येथे बुधवारी एका खाजगी कार्यक्रमासाठी आल्यानंतर मुनगंटीवार हे पत्रकारांशी बोलत होते. सध्याचे महाराष्ट्रातील सरकार हे व्हेंटीलेटरवर आहे. त्यामुळे ते फार काळ टिकणार नाही. २५ आॅक्टोबर १९५१ पासूनचा इतिहास पाहिला असता. देशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणत्याही निवडणुकीतील भिन्न विचारसरणीची कोणतीही सत्ता सलग पाच वर्ष टिकली नसल्याचा हवाला देत सध्याचे सरकार किती दिवस टिकेल हे कोणालाही सांगता येत नसल्याचे मुनगंटीवार म्हणाले. काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी नुकतेच जे विधान केले ते मात्र अगदी खरे आहे. हे सरकार मुस्लिम समाजाच्या आग्रही मागणीमुळे भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेनेशी युती करुन स्थापन झाले आहे. या सरकारला शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाबाबत काहीही देणे घेणे नसल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली.
शिवसेनेचा प्रस्ताव आल्यास आजही सत्ता स्थापन करू
शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. त्यामुळे ‘सुबह का भुला शाम को घर आये तो उसे भुला नही कहते’. असे सांगत शिवसेनेने आजही प्रस्ताव दिला तर सरकार स्थापनेसाठी आम्ही तयार असल्याचे प्रतिपादन माजी अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी केले.