नांदेड/मुंबई - नांदेडमध्ये २४ तासांत २४ रुग्ण दगावल्याची घटना उघडकीस आल्यामुळे राज्यभर खळबळ उडाली होती. त्यानंतर, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील रुग्णालायातीलही गंभीर परिस्थिती समोर आली आहे. त्यानंतर, विरोधी पक्ष आक्रमक झाला असून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज नांदेड येथील शासकीय रुग्णालयात जाऊन पाहणा केली. तसेच, रुग्णलयात उपचार रुग्णांच्या आणि मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या पीडित नातेवाईकांची भेट घेतली. यावेळी, नातेवाईकांनी विरोधी पक्षनेत्यांसमोर टाहो फोडल्याचं पाहायला मिळालं.
नांदेड शासकीय रुग्णालयातील घटना हृदय पिळून टाकणारी आहे. कुटुंबीय धाय बोकलून रडत होते. नवजात बालकांचा काय दोष आहे? माणुसकी असलेला कोणताही व्यक्ती संवेनशीलतेने हे सगळं पाहू शकत नाही. जे कुटुंब उध्वस्त झाले त्यांना सरकारने आतातरी माणुसकी दाखवत प्रत्येकी १० लाखांची आर्थिक मदत तातडीने द्यावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच, सरकारसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही त्यांनी लक्ष्य केलं. भाजप चाणक्यला आमदार पुरवायला, गोळा करायला फोडायला वेळ मिळतो. पण, इथे शासकीय रुग्णालयात आवश्यक यंत्रणा आणि भरती करायला वेळ नाही, असे म्हणत नाव न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.
दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी रुग्णालयात भेट दिल्याचा व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला आहे. त्यामध्ये, रुग्णांचे पीडित नातेवाईक धाय मोकलून रडताना, विरोधी पक्षनेत्यांसमोर टाहो फोडोताना दिसून येतात.
सुषमा अंधारे, सुप्रिया सुळेंनी साधला निशाणा
मृत्यूच्या तांडवामुळे खडबडून जागे झालेल्या राज्य शासनाने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले. राज्यातील सरकारी रुग्णालयामध्ये मृत्यूच्या अशा घटना आता समोर येत आहेत. नांदेडनंतर आता नागपूरमध्ये देखील काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिल्ली वाऱ्या करायला वेळ आहे, पण या रुग्णालयांना भेट देण्यासाठी वेळ नाही" असं म्हणत निशाणा साधला आहे. आता, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही आरोग्यमंत्री व वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.