सोमवारी मनपाच्या विशेष सभेत स्थायी समितीने मंजूर करून 953 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सभागृहापुढे ठेवले होते. महापौर मोहिनी येवनकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत अनेक नगरसेवकांनी अंदाजपत्रकावर त्यांच्या महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या आहेत, काही बदल सुचविले आहेत. मनपा अर्थसंकल्पीय सभेत नगरसेवक बापूराव गजभारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन व इतर सामाजिक उपक्रम राबवावे, मनपाचे उत्पन वाढविण्यासाठी व मध्यमवर्गीय जनतेसाठी बहुउद्देशीय सभागृह दक्षिण व उत्तर नांदेडमध्ये बांधण्यात यावे, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय नागरी वस्ती सुधार योजनेच्या निधीतून होणाऱ्या विकासकामांसाठी वापरलेल्या निधीच्या ठिकाणी योजनेच्या नावाचा फलक लावण्यात यावा, अशा आदी सूचना केल्या. चर्चेनंतर अंदाजपत्रक मंजुरीसंबंधी महापौरांना सर्वाधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला.
नगरसेवकांनी दिलेल्या सर्व सूचनांचा अभ्यास करून योग्य तो बदल अंदाजपत्रकात करून येत्या सात- आठ दिवसांत मंजूर करण्यात येईल, अशी माहिती महापौर मोहिनी विजय येवनकर यांनी दिली.
त्याचवेळी शहरातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले असल्याचेही महापौर येवनकर यांनी सांगितले.