नांदेड : राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असून, सध्या प्रवेशासाठीची नोंदणी करून घेतली जात आहे. त्यासाठी दिलेली बेवसाइट वारंवार हँग होत असल्याने विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी २४ जुलैपासून प्रारंभ झाला आहे. मात्र दोन-दोन दिवस ओटीपी मिळत नाही. जिल्ह्यांची निवड करताना राज्यातील जिल्ह्यांची यादी दिसत नाही. पिन कोड क्रमांक येत नाही. ही सर्व माहिती कशीबशी भरली तर पेमेंट करता येत नाही. कागदपत्र संकेतस्थळावर अपलोड होत नाहीत. अशा अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. वैद्यकीय शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया महत्त्वपूर्ण असून, तांत्रिक कारणामुळे जर प्रवेश झाले नाही तर ते नुकसान मोठे असेल. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाने यावर तातडीने उपाय करावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
एक महिना उशिराने प्रक्रियावैद्यकीय प्रवेशासाठी ७ मे २०२३ रोजी नीट परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल १३ जून रोजी जाहीर करण्यात आला. वैद्यकीय प्रवेशासाठी जवळपास एक महिना उशिराने सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सीईटी सेलच्या माध्यमातून राज्यात ही प्रक्रिया राबविली जात आहे. प्रत्यक्षात ऑगस्ट महिन्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र सध्याचे वेळापत्रक पाहता, १५ टक्के प्रवेशांसाठी ऑल इंडिया कोटाची फेरी सुरू आहे. त्यानंतर ९ ते १४ ऑगस्ट या काळात दुसऱ्या फेरीची नोंदणी होईल. त्यामुळे ऑगस्ट अखेरपर्यंत प्रवेश प्रक्रिया चालणार असून, सप्टेंबरमध्ये अभ्यासक्रमास प्रारंभ होणार आहे. एक महिना उशिराने महाविद्यालये सुरू होतील, त्याचाही फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागणार आहे.