पेट्रोल दरवाढीबाबत कराड यांनी सांगितले की, पेट्रोलला आता जीएसटीच्या कक्षेत आणणे हाच पेट्रोलचे दर कमी करण्याचा उपाय आहे. त्याबाबत केंद्र सरकार विचार करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी पेट्रोलवरील कर निश्चिती करण्याच्या विषयात कॅबिनेट मंत्रीच अधिक चांगले सांगू शकतील, असे ते म्हणाले. उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत आणखी एक कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यापूर्वी हे ८ कोटींचे असलेले उद्दिष्ट ९ कोटींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेले असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. ओबीसी आरक्षणाचा विषय सोडविण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे. केंद्र सरकारमध्ये आजघडीला २७ ओबीसी, १२ एससी, ८ आदिवासी, ११ महिला मंत्री असल्याचे ते म्हणाले.
जनआशीर्वाद यात्रा ही केंद्रीय मंत्रिमंडळात
७ जुलै रोजी नव्याने समाविष्ट झालेल्या मंत्र्यांनी जनआशीर्वाद यात्रा काढावी, असे आदेश पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिले होते. त्या आदेशानुसार केंद्राच्या २०१४ पासूनच्या विविध योजनांचा लाभ झालेल्या लाभार्थ्यांशी या जनआशीर्वाद यात्रेत चर्चा केली जात असल्याचेही डॉ. कराड यांनी सांगितले.
यावेळी खा. प्रताप पाटील चिखलीकर, आ. डॉ. तुषार राठोड, आ. भीमराव केराम, आ. अतुल सावे, भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गाेजेगावकर, ॲड. गणेश हाके, प्रवीण पाटील चिखलीकर, आदींची उपस्थिती होती.
चौकट -
मुंडे भगिनी नाराज नाहीत..
केंद्रीय मंत्रिमंडळात मराठवाड्यातून भाजपने खा. प्रीतम मुंडे यांना संधी द्यावी अशी अपेक्षा होती. मात्र मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज आहेत का, याबाबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री कराड यांनी मुंडे भगिनी नाराज नाहीत, त्या जनआशीर्वाद यात्रेत सोमवारी पूर्णवेळ सहभागी झाल्या होत्या. माझ्या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवातच गोपीनाथ गडावरून करण्यात आली आहे. तिथे यात्रेच्या सुरुवातीदरम्यान दिलेल्या घोषणांबाबत मात्र कराड यांनी कानावर हात ठेवत, मी कोणत्याही घोषणा ऐकल्या नसल्याचे सांगत विषयाला बगल दिली.