किनवट (जि. बीड) : तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी लवकरच भारत राष्ट्र समिती (‘बीआरएस’) ही देशपातळीवर काम करणार असून, त्याची सुरुवात महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यापासून करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यातच तेलंगणातील ‘बीआरएस’च्या आजी-माजी लोकप्रतिनिधींनीही किनवट तालुक्यातील सीमावर्ती भागात भेटी-गाठी घेतल्या आहेत.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर निवडणुका पूर्ण ताकदीने लढविण्याची तयारी बीआरएसचे नेते दर्शवित आहेत. त्यामुळे या भागातील गाव पुढारीही कानोसा घेऊ लागले आहेत. एकंदर बीआरएसची एन्ट्री कोणत्या पक्षाच्या पथ्यावर पडते, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.किनवट तालुक्यातील सीमावर्ती भागातील गावांना तेलंगणा राष्ट्र समितीचे (टीआरएस) माजी खासदार नागेश घोडाम, आमदार बापूराव राठोड हे भेटी देऊ लागले आहेत. त्यांचा टीआरएसचा झालेला बीआरएस पक्ष सीमावर्ती किनवट तालुक्यात आगामी जि.प. व पं.स. निवडणुका लढणार आहे. तसे त्यांनी स्पष्ट केल्याने, त्यांचा पक्ष कोणाच्या पथ्यावर पडणार हे काळच सांगेल. डिसेंबर, २०२२ मध्ये तेलंगणातील बीआरएसच्या नेत्यांनी किनवट येथील वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे आता तरी महाराष्ट्र शासन प्रलंबित असलेली अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची मागणी पूर्ण करेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
२० डिसेंबर रोजी आदिलाबादचे टीआरएस पक्षाचे माजी खासदार नागेश घोडाम यांनी किनवटला भेट दिली. विधिज्ञ, पत्रकार यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर, २२ डिसेंबर रोजी तेलंगणा राष्ट्र समितीचे आमदार बापूराव राठोड यांनी किनवट येथे भेट देऊन वकील संघ व इतरांशी चर्चा केली. २३ डिसेंबर रोजी किनवट तालुक्यातील बुधवारपेठ या आदिवासी गावाला माजी खासदार नागेश घोडाम यांनी भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. कालचा टीआरएस व आजचा बीआरएस पक्ष संपूर्ण ताकदीनिशी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि इतर होणाऱ्या निवडणुकीत उतरेल, असे ते स्पष्ट करत असल्याने आगामी काळात हा पक्ष कोणाच्या पथ्यावर पडेल, हे आज तरी सांगणे कठीण झाले आहे.
भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) आमदार बापूराव राठोड, माजी खासदार नागेश घोडाम व त्यांची टीम सध्या सीमावर्ती किनवट तालुक्यातील गावांना भेटी देत आहे. ते इकडे लक्ष ठेवून आहेत. तेलंगणा राज्यात ज्या-ज्या सुविधा आहेत, त्या-त्या सुविधा आमचा पक्ष देईल, हे पटवून सांगत असल्याने किनवट तालुक्यात हा पक्ष आपले पाय रोवू पाहत असल्याचे चित्र आहे.