विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात वर्षभरात जवळपास १० हजारांवर महिलांची प्रसूती होते. यातील बहुतांश महिलांवर सिझेरियन करण्याची वेळ येते. अशा बाळंतपणाचा सामना केल्यानंतर महिलांना पुन्हा कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करावी लागते. मागील तीन वर्षांची आकडेवारी पाहिली तर येथील शासकीय रुग्णालयात महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या नसबंदीचे आकडे शू्न्य आहेत. विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात २०१९ मध्ये २५३ महिलांची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यामध्ये एकाही पुरुषाने कुटुंंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेली नाही. विशेष म्हणजे या रुग्णालयात पुरुष नसबंदी करण्याची सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
............................
चौकट -
जिल्ह्यात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी महिलांचा पुढाकार मोठ्या प्रमाणात आहे. मात्र भीती किंवा संकुचित वृत्तीमुळे पुरुषांचे या शस्त्रक्रियेसाठी सहकार्य मिळत नाही. यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने दरवर्षी जनजागृती करण्यात येते. गतवर्षी कोरोनामुळे महिलांच्या शस्त्रक्रियेची गती मंदावली होती. मात्र त्या अगोदर २०१९-२० मध्ये १९ हजारांवर महिलांनी शस्त्रक्रिया केली.
- डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड.
.....................................
चौकट-
महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या नसबंदीचे प्रमाण कमी आहे, याबाबत अनेक गैरसमज आहेत. मात्र ते दूर झाले पाहिजेत; परंतु असे होत नाही. समाजात महिलांनीच कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करावी, असा पायंडा पडला आहे. पुरुष नसबंदीही झाली पाहिजे, असे माझे मत आहे.
- व्यंकटेश चव्हाण, छत्रपती चौक, नांदेड.
--------------------
चौकट-
पुरुषांना कष्टाची कामे करावी लागतात. त्यामुळे महिलांनीच कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करावी, असा समज समाजात रूढ झाला आहे. त्यानुसार महिलासुद्धा कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेतात. त्यामुळे मग पुरुष नसबंदीसाठी पुढे येत नाहीत.
- गोविंद अवचार, तरोडा नाका, नांदेड