देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी माहूरच्या विकासासाठी २४० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. या उलट माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणांनी स्थापन केलेल्या माहूर तीर्थक्षेत्र विकास प्राधिकारणासाठी ७९ कोटींची घोषणा झाली. त्यात केवळ १५ कोटींची कामे झाली. माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुखांनी १८ कोटी, तर माजी पालकमंत्री माणिकराव ठाकरे यांनी १४ कोटींचे गाजर माहूरकराना दाखविले; परंतु त्यापैकी फुटकी कवडीही माहूरला मिळाली नाही. तीन वर्षांपूर्वी औरंगाबाद येथील मंत्रिमंडळ बैठकीत घोषित केलेल्या २४० कोटींच्या माहूर विकास निधीचा अर्थपुरवठा करण्यासाठी त्यांची स्वाक्षरीच झाली नाही. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर मात्र माहूरकर जाम खुश आहेत. गडकरी यांनी केवळ घोषणाच केली नाही, तर प्रत्यक्षात कामालाही सुरुवात केली. नागपूर-तुळजापूर व्हाया माहूर-किनवट-व्हाया आदिलाबाद-चंद्रपूर हा राष्ट्रीय महामार्ग मंजूर केला. याशिवाय एक वर्षांपूर्वी सात कोटी रुपये माहूरच्या विविध विकासकामांना देऊ केले आहेत. दरम्यान, मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे एक रुपयाही माहूरला मिळाला नाही. पुढील काळातही निधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
विकास निधीच्या नुसत्या घोषणा, प्रत्यक्षात खडकूही नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 4:17 AM