- युसूफमियाँ नदाफ (नांदेड)
शेती करण्याची जिद्द व चिकाटीद्वारे पार्डी म. (ता. अर्धापूर, जि़ नांदेड) येथील ज्ञानेश्वर भांगे पाटील या शेतकऱ्याने दुष्काळातही इतरांना प्रेरणादायी अशी शेती कसली आहे. चोख व्यवस्थापनाने पॉलीहाऊसमधील जरबेरा, टरबूज, हळद या पिकांतून त्यांनी लाखो रुपये उत्पन्न मिळविले आहे.
पार्डी येथे ज्ञानेश्वर दिगंबरराव भांगे पाटील यांचे एकत्र कुटुंब आहे. इतर भाऊ विविध व्यवसाय सांभाळतात. मोठा भाऊ गजानन यांच्या मार्गदर्शनात ज्ञानेश्वर भांगे पाटील हे वडिलोपार्जित चाळीस एकर शेतीचा भार एकट्याच्या खांद्यावर पेलत असून, मातीतून मोती पिकवित आहेत. दुष्काळामुळे शेतीत पाण्याची कमतरता पडते याची जाणीव असल्याने त्यांनी शेतीचे अगदी चोख व्यवस्थापन केले आहे. सर्व शेतीत ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून कमी पाण्यात जास्तीचे उत्पन्न कसे घेता येईल, यावर त्यांचा नेहमी भर असतो.
शेतीत तीन विहिरी असून संपूर्ण शेतात त्यांनी पाईपलाईनचे जाळे विणले आहे. माल वाहतूक करण्यासाठी बांधापर्यंत मजबूत कच्चे रस्ते आहेत. शेतीत विविध नवनवीन पिकांचा ते नेहमी प्रयोग करतात. त्यांनी वीस गुंठ्यावर पॉलीहाऊसची उभारणी केली. यात लाल माती आणून गादीवाफे तयार करून जरबेराची लागवड केली. नांदेड व हैदराबादच्या मार्केटमध्ये विक्री करीत जवळपास तीन वर्षांमध्ये पंधरा लाख रुपयांचे उत्पन्न काढले होते.
मागील दोन, तीन वर्षांमध्ये इसापूर धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे केळीची लागवड घटली होती. अशावेळी कमी पाण्यात व कमी वेळेत येणारे पीक म्हणून तीन एकरमध्ये टरबूज लागवडीचा निर्णय घेतला. दुष्काळी परिस्थितीत कमी पाण्यात नियोजनबद्ध व्यवस्थापन, जिद्द आणि चिकाटीच्या बळवर तीन एकरमध्ये आठ लाख रुपयांचे उत्पन्न काढले. याबद्दल ‘लोकमत’ परिवाराच्या वतीने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
गतवर्षी सात एकरमध्ये हळदीमध्येही विक्रमी उत्पादन काढून दोनशे क्विंटलच्या वर उत्पन्न काढले आहे. यावर्षीही त्यांनी बारा एकरवर हळद पिकाची लागवड केली आहे. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पशुधनही आहे. या पशुधनापासून त्यांना भरपूर शेणखत मिळते. यामुळे उत्पन्नात भर मोठी भर पडत आहे. पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड देत विविध पिकांत चोख व्यवस्थापन, पिकांचे सूक्ष्म निरीक्षण, कीडरोग नियंत्रणासाठी तात्काळ उपाययोजना त्यांनी केले आहे.
पाणी, खते, फवारणी, वातावरणात होणारे बदल याबाबत दक्ष राहिल्यास शेती चांगली पिकेल आणि शेतकरीही टिकेल, असा आत्मविश्वास ज्ञानेश्वर भांगे पाटील हे व्यक्त करतात. त्यांनी शेतीत केलेले नवनवीन प्रयोग पाहण्यासाठी परिसरातीलच नव्हे तर इतर जिल्ह्यांमधूनही शेतकरी त्यांच्या शेतावर भेटी देत असतात. एवढेच नव्हेतर, कृषीविभागातील अधिकारीही भेट देऊन पाहणी करतात.उत्तम व्यवस्थापनाद्वारे शेती यशस्वी करून त्यांनी शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.