शाळाबाह्य विद्यार्थी राहू नयेत, यासाठी शासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र, विद्यार्थी गळतीचे प्रमाण विविध कारणांमुळे सुरूच आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागातील विद्यार्थी यामध्ये सर्वाधिक आहेत. गावात काम मिळत नसल्याने अनेक नागरिक दरवर्षी मोठ्या शहरात कामासाठी स्थलांतरित होतात. अशा वेळी मुलांनाही सोबत घेऊन जातात. जर मुलगा १५, १६ वर्षांचा असेल तर त्यालाही एखादे काम मिळवून देतात. त्यामुळे शिक्षणापासून या विद्यार्थ्यांची नाळ तुटत आहे. अनेक कारणांपैकी स्थलांतर हे प्रमुख कारण असून, दरवर्षी जवळपास २ ते अडीच हजार विद्यार्थी शिक्षणापासून दूर जात असल्याचे चित्र आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबवली आहे.
जिल्ह्यात प्राथमिक विद्यार्थ्यांच्या तुलनेत माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण अधिक असून हिमायतनगर व मुदखेड तालुक्यात सर्वाधिक विद्यार्थ्यांची गळती आहे. विद्यार्थ्यांच्या या गळतीचे कारण स्थलांतर आहे. ग्रामीण भागातील पालक पोटासाठी मुंबई, पुणे, हैदराबाद आदी शहरांत जातात. त्यामुळे विद्यार्थीही पालकांसोबत स्थलांतरित होतात. जिल्ह्यात जवळपास अडीच हजार विद्यार्थी ड्राॅप झाले.