नांदेड/हिंगोली/परभणी: नांदेड , परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील काही भागांना आज सकाळी ६ वा ५ मिनिट ते ६ वा २४ मिनिटांच्या दरम्यान भूकंपाचे तीन सौम्य धक्के जाणवले. दरम्यान, बीड जिह्यातील काही भागांत देखील भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असल्याची माहिती आहे. अचानक धरणीकंप जाणवल्याने नागरिक भीतीने घराबाहेर पडले.
दरम्यान, या भूकंपाची ४.५ रिश्टर स्केलची नोंद झाल्याची माहिती हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूरपासून १५ किलोमीटरवर वरील पांग्रा शिंदे गावात दाखवला जात आहे.
सेलू तालुक्यात धक्कासेलू शहरात आणि तालुक्यात सकाळी सहा वाजून दहा मिनिटाला जवळपास ६ सेकंदाचा सौम्य भूकंपाचा धक्का झाल्याचा प्रकार घडला आहे. सहा वाजून दहा मिनिटाला खडखड असा आवाज होत जमीन हादरल्याचा प्रकार जवळपास ६ सेकंद सुरू होता. विशेषतः ज्यांची घरे पत्राची आहेत त्यांना मात्र हा प्रकार मोठ्या प्रमाणात लक्षात आल्याने धावपळ उडाली. काही वेळातच भुकंपाच्या सौम्य धक्याची माहिती सोशलमिडीयावर व्हायरल झाली. तालुक्यातील चिकलठाणा ,देवगांवफाटा या भागात हा सौम्य ६:१२ मि.झाला.
नांदेड शहर, तालुक्याला हादरानांदेड शहर आणि जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील अनेक गावांत आज सकाळी ६ वा ८ मि आणि ६ वा १९ मि भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने भितीने नागरिक घराबाहेर पडले. नांदेडच्या 'सिडको-हडको' परिसरात देखील सकाळी ०६:०५ ते ०६:०८ वाजेच्यादरम्यान भुकंपाचा सौम्य धक्का जाणवला.
हिंगोली जिल्ह्यात केंद्रबिंदू, भिंत कोसळलीभूकंपाच्या धक्क्यांची मालिका हिंगोली जिल्हात मागील काही दिवसांपासून सुरू आहे. आज सकाळी नागरिकांनी पुन्हा सौम्य धक्का अनुभवला. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात भूकंपाचा केंद्रबिंदू दाखवला जात आहे. लोक भयभीत होऊन घराबाहेर पडले आहेत. दरम्यान, दांडेगाव, वारंगा फाटा सह परिसरात पहाटे सहा वाजून पाच मिनिटे, सहा वाजून एकोणवीस मिनिटे आणि सहा वाजून चोवीस मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. पहिल्या धक्क्यात दांडेगाव येथील मातीच्या घराच्या भिंती कोसळल्या आहेत. दांडेगाव येथील जंगलबाई जगनसिंग ठाकूर यांच्या घराच्या भिंती कोसळून संसार उघड्यावर आला आहे. भूकंपाच्या तीव्रतेमुळे नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले.