नांदेड : शहरातील श्रीनगर भागात रविवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची ०.६ आणि ०.८ अशी नोंद झाली.
यापूर्वीही याच भागात हिवाळ्याच्या दिवसांत भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी त्याची तीव्रता मात्र जास्त होती. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पाच वर्षांपूर्वी नांदेडात श्रीनगर भागात हिवाळ्याच्या दिवसांत भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यामुळे काही घरांच्या भिंतीना तडेही गेले होते. भीतीपोटी नागरिकांनी रस्त्यावरच रात्र काढली होती. त्यानंतर मात्र धक्क्यांची ही मालिका बंद झाली होती. त्यात आता काही दिवसांपूर्वीच रात्रीच्या वेळेला धक्का जाणवला होता.त्यानंतर रविवारी सकाळी ११ वाजून ९ मिनिटांनी ०.६ आणि ११ वाजून ३२ मिनिटांनी ०.८ तीव्रेतेचे धक्के जाणवले.
सिसमोग्राफवर त्याची नोंद झाली. विद्यापीठाच्या उत्तर पूर्वेकडे साधारणत नऊ किलोमीटर अंतरावर या धक्क्यांचा केंद्रबिंदू होता. अत्यंत छोटे धक्के असल्यामुळे त्याचे नेमके केंद्रस्थान सांगणे अवघड असते. असे धक्के सातत्याने आणि वाढते जाणवल्यास काळजी करण्यासारखे आहे. सर्वसाधारणपे पाच रिश्टर स्केलपर्यंत स्पंदने जाणवली तर फारसा फरक पडत नाही, अशी माहिती भूगर्भशास्त्रज्ञांनी दिली.