नांदेड : नांदेड शहरामध्ये अनधिकृत वाइन बारची संख्या माेठ्या प्रमाणावर वाढली आहे. जणू चाैकाचाैकातच वाइन शाॅप, देशी दारू, बीअर शाॅपीच्या आडाेशा हे ‘मिनी बार’ थाटले गेल्याचे चित्र आहे. या दुकानांच्या आजूबाजूने डिस्पाेजेबल ग्लास, चकनाच्या रिकाम्या पाकिटांचा साचलेला कचरा या मिनी बारच्या उलाढालीतील भक्कम पुरावा ठरला आहे. राज्य उत्पादन शुल्क (एक्साइज) विभागाच्या जाणीवपूर्वक व अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे या अनधिकृत मिनी बारची प्रचंड भरभराट पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यात एक्साइजच्या रेकाॅर्डवर वाइन शाॅप, बीअर बार, बीअर शाॅपी, देशी दारूची दुकाने, भट्टी यांची संख्या बरीच आहे. त्यांच्यामार्फत हाेणाऱ्या दारू विक्रीतूनच राज्य शासनाला माेठा महसूल मिळताे. हा महसूल वाढविण्याची जबाबदारी एक्साइजच्या यंत्रणेवर आहे; परंतु अनेक ठिकाणी अनधिकृत कारभारामुळे शासनाच्या या महसुलाला ब्रेक लागताे आहे. बीअर बारमध्ये गेल्यास अधिकचे पैसे (सेवा शुल्क) लागतात, ते वाचावे म्हणून मद्य शाैकिनांनी मध्यम मार्ग निवडला आहे. वाइन शाॅपमधून दारू घ्यायची आणि तिथेच आजूबाजूला बसून ती रिचवायची, असा फंडा सर्रास वापरला जाताे. त्यासाठी अनेक वाइन शाॅपकडून कुठे उघडपणे तर कुठे छुप्या मार्गाने डिस्पाेजेबल ग्लास, पाणी, चकना उपलब्ध करून दिला जाताे. काही वाइन शाॅपच्या बाजूला असलेल्या दुकानातून ही व्यवस्था उपलब्ध हाेते. वाइन शाॅप परिसरात केव्हाही हे चित्र पाहायला मिळते. विशेषत सायंकाळी व रात्री हे चित्र आणखी माेठ्या संख्येने व ठळकपणे कुण्याही तेथून जाणाऱ्या-येणाऱ्यांच्या दृष्टीस पडते. नांदेड शहरातील राज काॅर्नर, ढवळे काॅर्नर, जुना माेंढा, अण्णाभाऊ साठे चाैक, शिवाजीनगर, तसेच शिवाजीनगर पाेलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर, भावसार चाैक, छत्रपती चाैक, शेतकरी चाैक, मालेगाव राेड, नाना-नानी पार्क राेड, गणेशनगर, वाय पाॅइंट आदी परिसरात मिनी बारचे हे चित्र सर्रास पाहायला मिळते. एवढेच नव्हे, तर देशी दारू दुकाने, बीअर शाॅपी येथेही हीच स्थिती आहे. शहराच्या विविध भागात लागणाऱ्या अंडा ऑम्लेट, अंडा राइसच्या गाड्यांवरही चाेरट्या मार्गाने अशा पद्धतीने दारूची विक्री केली जाते. महामार्गावरील अनेक ढाब्यांमध्येही दारू विक्रीचा हा गाेरखधंदा राजराेसपणे सुरू आहे.
शासनाने दारूची ही अवैध पद्धतीने हाेणारी विक्री राेखण्याची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आहे. मात्र, या यंत्रणेकडून काेणतीच कारवाई हाेताना दिसत नाही. सर्वसामान्य नागरिकांना सायंकाळी वाइन शाॅपच्या बाजूला दिसणारे मद्य शाैकिनांचे जथे-गर्दी एक्साइजच्या यंत्रणेला दिसत नसावी का, असा प्रश्न निर्माण हाेताे. या गर्दीला एक्साइजचे छुपे पाठबळ तर नाही ना, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. परवानाधारक दारू विक्रेत्यांना नियमानुसार वेळ ठरवून देण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही ही दुकाने उशिरापर्यंत सुरू असतात. काही दुकाने शटर बंद करूनही उशीरापर्यंत दारूची विक्री करतात. शहरातील व बाहेर जाणाऱ्या मार्गावरील वाइन बार, ढाब्यांची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. पाेलिसांची रात्र गस्त सुरू असेल तर निर्धारित वेळेनंतर हे बार, ढाबे चालतातच कसे, हा प्रश्न आहे. एकूणच एक्साइज व पाेलीस यंत्रणेच्या अप्रत्यक्ष संरक्षणामुळे नांदेड शहरात वाइन शाॅप-बीअर शाॅपींच्या परिसरात असे अनेक मिनी बार नावारूपाला आले असून, त्यांची भरभराटही झपाट्याने हाेत आहे. नियंत्रणाची जबाबदारी असलेली शासनाची यंत्रणा या भरभराटीत ‘वाटेकरी’ तर नाही ना, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. अनधिकृत दारू विक्री राेखण्यासाठी एक्साइजकडे अनेक निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, उपअधीक्षक व काॅन्स्टेबल आहेत. एक्साइजचे भरारी पथकही आहे. याशिवाय औरंगाबादच्या उपायुक्त व मुंबईच्या आयुक्त कार्यालयातील पथकांनाही धाडीचे अधिकार आहेत. मात्र, ही पथके अलीकडे शहरात येऊन गेल्याचे ऐकिवात नाही. पथके आलीच असेल तर त्यांची ‘कामगिरी’ अद्याप गुलदस्त्यात आहे.
एक्साइज एसपीचे मुख्यालय असलेल्या नांदेड शहरात अवैध दारू विक्री, मिनी बारची ही अवस्था असेल, तर ग्रामीण भागात काय चित्र असेल याची कल्पनाच न केलेली बरी.