नांदेड : राहुल गांधी यांनी जाहीर केलेल्या किमान उत्पन्न योजनेवर भाजपा टिका करीत आहे. काँग्रेसची ही योजना चांगली असल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणल्याचे सांगत त्यातूनच या योजनेवर टीका होत आहे. काँग्रेसकडे मनमोहन सिंग, पी. चिदंबरम यांच्यासारखे अर्थतज्ज्ञ आहेत. सरकार कसे चालवायचे ? सरकारसाठी रिसोर्सेस कसे उभे करायचे? याचा अभ्यास या तज्ज्ञांचा आहे. त्यामुळे काँग्रेसची ही योजना आमचे सरकार आल्यास आम्ही चांगल्या पद्धतीने राबविण्यात येईल, असा निर्धार खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला.बुधवारी सायंकाळी ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना-भाजपाला तुम्ही विरोधक मानता तर मग त्यांच्या ऐवजी केवळ काँग्रेसवरच टिकेची झोड का? असा प्रश्न करीत केवळ काँग्रेसवर टीका केली जात असल्यामुळेच वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट होत नाही. त्यातूनच ‘बी-टीम’ कोण ? असा प्रश्न सर्वसामान्य उपस्थित करतात, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. एमआयएमने काँग्रेस बुडण्याची चिंता करु नये, काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्ते काँग्रेसच्या बळकटीसाठी कटीबद्ध आहेत. त्यांनी काय ते एमआयएमचे पहावे, अशी टीप्पनीही चव्हाण यांनी केली.प्रकाश आंबेडकर यांनी रत्नागिरी लोकसभा उमेदवाराच्या अनुषंगाने काँग्रेस आरएसएस समर्थक असल्याचा आरोप केला असल्याचे विचारले असता, काँग्रे्रसचा राष्टÑीय स्वयंसेवक संघाशी दुरान्वयेही संबंध नाही.काँग्रेसची विचारधारा स्वतंत्र आहे. आरएसएसशी आमचा वैचारिक विरोध आहे. त्यामुळे काँग्रेस त्यांची समर्थक होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. खरे तर प्रकाश आंबेडकर यांनी सेना-भाजप विरोधात बोलले पाहिजे. मात्र ते काँग्रेसवर टीका करीत आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी या दोघांचीही भूमिका स्पष्ट होत नाही. या अशा विधानामुळेच भाजपाची ‘बी-टीम’ कोण? असा प्रश्न चर्चेत येतो, असेही चव्हाण यांनी सांगितले. यावेळी काँग्रेस- राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती़
- जिल्ह्याने सातत्याने काँग्रेसच्या बाजूने कौल दिलेला आहे़ जनतेचे काँग्रेसशी अतुट असे नाते आहे़ त्यामुळे नांदेडमध्ये विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी येथील सुजाण मतदार काँग्रेसची साथ सोडणार नाहीत़ नांदेडच्या सर्वांगिण विकासासाठी मी कटीबद्ध आहे़ माझ्यावरील विश्वासाचे हे नाते या निवडणूकीच्या माध्यमातून अधिक मजबूत होईल, असा विश्वास अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला़