दुचाकी असो वा कोणतेही वाहन त्यास सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दोन्ही बाजूने आरसा बसविण्यात येतो. परंतु, मागून येणारे वाहन पाहण्यापेक्षा या आरशाचा उपयोग हा केस विंचरण्यापुरता अथवा आरसा काढून गाडीचा आगळावेगळा लूक करण्याचा प्रयत्न वाहनधारक करत आहेत. परंतु, आरसा न वापरणाऱ्या वाहनधारकांवरील कारवाईदेखील नगण्य आहे. नांदेड जिल्ह्यात जवळपास साडेपाच लाख दुचाकींची संख्या असून त्यातील अडीच लाखांवर दुचाकींचा शहर व परिसरात वावर असतो. यातील बहुतांश गाड्यांना साईडग्लास बसविलेला नसतो. परंतु, त्या वाहनधारकांवर कारवाईदेखील होताना दिसत नाही. यामध्ये महाविद्यालयीन तरूणांच्या गाड्या अधिक प्रमाणात असतात. नांदेड शहरात मागील वर्षभरात जवळपास १३२ दुचाकीस्वारांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. साईडग्लास नसल्याने वाहनधारकांना मोटार वाहन कायद्यानुसार २०० रूपये दंड ठोठावला जातो. त्यानुसार १३२ वाहनधारकांकडून २६ हजार ४०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. ग्लास नसलेल्या दुचाकीचा राबता असतो. एखाद्या गाडीला ओव्हरटेक करताना अथवा वळण रस्त्यावर साईडग्लासचा उपयोग होतो. परंतु, ग्लास नसल्याने अनेकवेळा अपघाताला निमंत्रण दिले जाते. त्यामुळे वाहतूक शाखेने ज्या वाहनांना आरसा नाही, त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे.
चौकट
नांदेड शहरात २ लाख ५४ हजार दुचाकी
आरसा नसल्याने २०० रूपये दंड
दुचाकी अथवा अन्य वाहनास आरसा बसविणे कायद्याने बंधनकारक आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आरसा असणे गरजेचे आहे. परंतु, अनेकजण हौस म्हणून आरसा काढून टाकतात. ज्या वाहनांना आरसा नाही, त्यांच्यावर मोटार वाहन कायदा १६१ नुकसान कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. यामध्ये वाहनधारकांना २०० रूपयांचा दंड होऊ शकतो.
दुचाकीला हे आहे बंधनकारक
दुचाकीसाठी साईडग्लाससह इंडीकेटर, हेडलाईट, ब्रेक लाईट तसेच पीयुसी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.अन्यथा मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकीस्वारास आरशासह विविध नियमांचे पालन न केल्याने वेगवेगळ्या प्रकारचा दंड बसू शकतो. त्यामुळे दुचाकीस्वारांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
शहरातील दुचाकीस्वारांवर वाहतूक शाखेकडून कारवाई मोहीम सुरूच असते. परंतु, मागील काळात मोहीम राबविल्याने ट्रिपल सीट, साईडग्लास नसणे यासह विविध नियमांचे पालन करण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच जे दुचाकीस्वार नियमांचे उल्लंघन करतात. त्यांच्यावर नियमितपणे कारवाई करण्याचे काम शहर वाहतूक शाखा करत आहे.
- चंद्रशेखर कदम, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा, नांदेड.