- श्रीनिवास भोसलेनांदेड :एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे सरकार बुधवारी रात्री कोसळलं. त्यानंतर गुरूवारी रात्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान, शिंदे यांच्या गटात नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार बालाजी कल्याणकर यांचाही समावेश आहे. त्यांनी केलेल्या या बंडातून त्यांचे कल्याण' होऊन. नांदेडला मंत्रिमंडळात स्थान मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात नेहमीच नांदेडचा दबदबा कायम राहिला आहे. दिवंगत डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या मुख्यमंत्री काळात १९७६ मध्ये नांदेडला दोन मंत्रिपद मिळाले होते. खुद्द शंकराव चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात पद्मश्री श्यामराव कदम हेदेखील राज्यमंत्री होते. त्यांच्याकडे माहिती जनसंपर्क आणि ऊर्जा, सिंचन अशी खाती होती. तर दुसऱ्यांदा जिल्ह्याला दोन मंत्रिमंडळे मिळाली ती १९९३ मध्ये शरद पवार मुख्यमंत्री असताना. या काळात अशोकराव चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री होते तर डॉ. माधवराव किन्हाळकर हे गृहराज्य मंत्री होते. त्याचबरोबर किन्हाळकर यांच्याकडे महसूल, सहकार, नगरविकास अशी महत्त्वाची खातीदेखील होती. परंतु, त्यानंतर दोन मंत्री कधी लाभले नाही. आजच्या परिस्थिती भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या बंडातून स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये नांदेड जिल्ह्याच्या पदरी काय पडणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे एकमेव आमदार बालाजी कल्याणकर यांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते अशी शक्यता राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. त्याचबरोबर भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याने निश्चितच भाजपच्या कोट्यातून नांदेडला मंत्रिपद मिळेल, असा दावा भाजपची काही मंडळी करत आहे. कल्याणकरांनी एवढे मोठे पाऊल उचलण्यामागे निश्चितच मंत्रिपदाची ऑफर असावी, असा तर्क त्यांच्या गोटातून व्यक्त केला जात आहे. परंतु, असे झाले नाही तर कल्याणकरांच्या पदरी निराशाच पडेल. उलट त्यांचे राजकीय नुकसान होईल हे मात्र निश्चित आहे.
नांदेडमध्ये भाजपचे डॉ. तुषार राठोड, राजेश पवार, भीमराव केराम आणि राम पाटील असे चार आमदार आहेत. यामध्ये डॉ. तुषार राठोड हे दुसऱ्यांदा विधिमंडळात गेले आहेत. त्याचबरोबर बंजारा चेहरा, उच्चशिक्षित ह्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. तर मराठा चेहरा म्हणून राम पाटील किंवा राजेश पवार यांचादेखील विचार होऊ शकतो. राज्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात असून त्यांना प्रतिनिधित्व देण्याची वेळ आली तर आमदार भीमराव केराम यांनादेखील मंत्रिपदाची अथवा किमान एखाद्या मंडळाची लॉटरी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पहिल्यांदाच आमदार अन् थेट पालकमंत्री२००९ मध्ये पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेल्या डी. पी. सावंत यांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागली होती. अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री म्हणून सावंत यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. त्याचबरोबर ते नांदेडचे पालकमंत्रीदेखील होते. विशेष म्हणजे सावंत ज्या नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्याच मतदारसंघातून आज बालाजी कल्याणकर आमदार आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच आमदार होणाऱ्या कल्याणकरांना सावंत यांच्याप्रमाणे पालकमंत्री पदापर्यंतची संधी मिळेल का? हे येणारा काळच सांगेल.
तर होईल १९७६, १९९३ ची पुनरावृत्तीबंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांना मंत्रिपद दिले आणि सर्वाधिक विधानसभा मतदारसंघ असलेल्या नांदेड जिल्ह्यात आपली ताकद वाढविण्याच्या दृष्टीने भाजपदेखील एखाद्या आमदाराला मंत्री करू शकते. असे झाले तर १९७६ आणि १९९३ प्रमाणे नांदेड जिल्ह्याला दोन मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. यापूर्वी भाजपने डी. बी. पाटील यांच्या माध्यमातून नांदेडला मंत्रिपद दिले होते.