चिखलीकरांसह राजू नवघरेंचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत; अजितदादा नांदेडला न्याय देणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 14:45 IST2025-03-12T14:42:22+5:302025-03-12T14:45:01+5:30
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंर हालचाली, मराठवाड्यातील या राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्रिपदावर कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चिखलीकरांसह राजू नवघरेंचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत; अजितदादा नांदेडला न्याय देणार का?
नांदेड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मीक कराडसोबतचे संबंध धनंजय मुंडे यांना भोवले असून, त्यांना आपल्या अन्न व नागरी पुरवठामंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे रिक्त झालेल्या मराठवाड्यातील या राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्रिपदावर कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीला शंभर टक्के स्ट्राइक रेट शंभर टक्के देणाऱ्या नांदेडवरील अन्याय दूर करण्याची ही संधी चालून आली आहे. आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे काय निर्णय घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
लोकसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर महायुतीने रणनीती आखून घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांची वज्रमूठ बांधत विधानसभा निवडणुकीत दणाणून विजय प्राप्त केला. यामध्ये नांदेडसह हिंगोली जिल्ह्याने शंभर टक्के कौल महायुतीला देत सर्वच्या सर्व जागा महायुतीच्या ताब्यात दिल्या; परंतु मंत्रिपदाचे वाटप करताना या दोन्ही जिल्ह्यांवर अन्याय झाला. राजकीयदृष्ट्या कायम चर्चेत राहिलेल्या नांदेड जिल्ह्याला नऊच्या नऊ आमदार निवडून देऊनही महायुती सरकारच्या नेत्यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवले; परंतु आज सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे मराठवाड्यात रिक्त झालेल्या या जागेवर नांदेड अथवा हिंगोलीला संधी देत अजितदादा तो अन्याय दूर करू शकतात.
आजघडीला राष्ट्रवादीच्या वाट्यातील अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपद रिक्त आहे. या जागेवर नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार प्रतापराव चिखलीकर, हिंगोली जिल्ह्यातील तरुण आमदार राजू नवघरे त्याचबरोबर माजी मंत्री संजय बनसोडे, बीड जिल्ह्यातील प्रकाश सोळंके यांच्याही नावांची चर्चा आहे. त्यादृष्टीने चर्चेत असलेले आमदारदेखील नेत्यांकडे पडद्यामागून फिल्डिंग लावत आहेत.
तर ‘घड्याळा’चा काटा पुढे सरकेल...
नांदेड जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघ भाजपच्या, तीन शिवसेनेच्या, तर एक राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. शंभर टक्के स्ट्राइक रेट असूनही नांदेडला मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले. महायुतीच्या काळात नांदेडवर नेहमीच अन्याय होतो? ही बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. खातेवाटप झाल्यानंतर नांदेडमधून शिवसेनेच्या कोट्यातून आमदार हेमंत पाटील यांचे नाव आघाडीवर होते; पण महायुतीमधील काही स्थानिक नेत्यांनी त्यांच्या नावाला विरोध केला आणि नांदेडची संधी हुकली. आजघडीला आमदार चिखलीकरांनी संघटनात्मक बांधणीसाठी कंबर कसली असून, माजी खासदार, माजी आमदार यांच्यासह मात्तबरांच्या हाती ते घड्याळ बांधत आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीला नांदेडसह हिंगोली आपली ताकद वाढवायची असेल तर मंत्रिपदाची ताकद देणे गरजेचे आहे. आमदार प्रतापराव चिखलीकर अथवा आमदार राजू नवघरे यांना मंत्रिपदाची संधी दिल्यास त्याचा आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला चांगला फायदा होऊ शकतो.
आमदार चिखलीकरांचे नाव आघाडीवर
राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आजघडीला प्रतापराव चिखलीकर यांचे नाव अजितदादांच्या यादीत आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर तरुण चेहरा म्हणून वसमतचे आमदार राजू नवघरे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव करून दुसऱ्यांदा विजय मिळविला आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो; परंतु नांदेड, हिंगोलीमध्ये मंत्रिपद देण्यासाठी काही भाजपच्या काही नेत्यांचा विरोध असल्याने पुन्हा नांदेड, परभणीला मंत्रिपदाची हुलकावणी मिळते की अन्याय दूर होतो, हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निर्णयावर अवलंबून आहे..